मुंबई : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मुंबईत २७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर विविध १५ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला होता. त्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या असून १, ५, ८ व ११ ऑगस्ट रोजी या परीक्षा घेण्यात येतील. याबाबतचे परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. परीक्षेच्या वेळेत व परीक्षा केंद्रामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> मुंबई: धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती; पाणीसाठा ७५ टक्के, तरीही चिंता कायम
बीपीएड व एमपीएड या अभ्यासक्रमांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुधारित तारखेनुसार या परीक्षा आता १ ऑगस्ट रोजी होणार आहेत. तृतीय वर्ष बी.ए, सत्र ५, एम.ए सत्र १, एम.ए सत्र १ (चॉईस बेस), एम.कॉम सत्र ४ ( ६०:४०), एम.एस्सी माहिती तंत्रज्ञान व एम.एस्सी संगणकशास्त्र (६०:४०) सत्र ४, एम.एस्सी गणित (८०:२०) सत्र ४, एमसीए सत्र ३ या अभ्यासक्रमांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा ५ ऑगस्ट रोजी होणार आहेत. द्वितीय वर्ष बीबीए / विधी शाखा ( ५ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र ३ व ४ या अभ्यासक्रमांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा ८ ऑगस्ट रोजी आणि एम.ए / एम.एस्सी व एम.एस्सी संशोधन सत्र १ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.