लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पाच वर्षीय विधि शाखेच्या (बीएलएस/एलएलबी) १० व्या सत्र परीक्षेचे एक बनावट वेळापत्रक तयार करून समाजमाध्यमांसह इतर माध्यमांवर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वेळापत्रकात आगामी परीक्षांच्या तारखांमध्ये फेरबदल दर्शविण्यात आले आहेत. मात्र हे मुंबई विद्यापीठाचे अधिकृत वेळापत्रक नसून गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणाची मुंबई विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

हे वेळापत्रक बनावट असल्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावर विश्वास ठेवावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे, तसेच बनावट वेळापत्रकाबाबत अधिक माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाला कळवावे, जेणेकरून या गैरप्रकाराला वेळीच थांबवता येईल, असेही डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

१६ एप्रिल ते ५ मेदरम्यान परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे पाच वर्षीय विधि शाखेच्या (बीएलएस/एलएलबी) १० व्या सत्राची परीक्षा ही बुधवार, १६ एप्रिल २०२५ ते सोमवार, ५ मे २०२५ या नियोजित कालावधीत घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची खात्री करण्यासाठी कृपया अधिकृत माध्यमांचा वापर करा आणि समाज माध्यमांसह इतर माध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.