मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर, शिक्षक, प्राचार्य व संस्थाचालकांच्या प्रतिनिधींच्या रखडलेल्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती आणि अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवरील नामनिर्देशित नियुक्त्या आणि निवडणूक रविवार, १५ डिसेंबर रोजी पार पडली. फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात अधिसभेच्या विशेष बैठकीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडली. त्यामुळे अपूर्ण असलेल्या विविध प्राधिकरणांना आकार मिळाला असून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न लवकरच सुटतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य गटातून प्रा. दिलीप भारमल (खुला प्रवर्ग) आणि प्रा. दिलीप पाटील (इतर मागासवर्ग प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली. तर अध्यापक गटातून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे डॉ. अनुप पळसोकर (खुला प्रवर्ग) हे एकूण ६९ मतदानातून ५१ मते घेत निवडून आले. तर डॉ. जगन्नाथ खेमनर (विमुक्त जाती प्रवर्ग) हे बिनविरोध निवडून आले. व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून सुनील जोशी (खुला प्रवर्ग) बिनविरोध निवडून आले. नोंदणीकृत पदवीधर गटातून ठाकरे गटाच्या युवा सेनेचे मिलिंद साटम (खुला प्रवर्ग) आणि शीतल देवरुखकर – शेठ (अनुसूचित जाती प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाटसदृश्य स्थिती ? जाणून घ्या, थंडी का वाढली?

विद्यापरिषदेवर व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून रविंद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीवर प्राचार्य गटातून प्रा. वसंत माळी आणि नोंदणीकृत पदवीधर गटातून ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांची बिनविरोध निवड झाली. तर अध्यापक गटातून स्थायी समितीवर डॉ. अनूप पळसोकर हे ४७ मतांनी निवडून आले. अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटातून डॉ. विनोद कुमरे हे ४८ मतांनी निवडून आले तर अध्यापकेत्तर कर्मचारी गटातून संतोष निकम यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, तसेच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नामनिर्देशित सदस्य असलेले राज्याचे प्रभारी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनीही उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला. विविध प्राधिकरणावर निवडून तसेच नामनिर्देशाने आलेल्या सर्व सदस्यांचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. तसेच ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या दोन सदस्यांची विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीवर (महाविद्यालय व विद्यापीठ स्तर) कुलगुरूंच्या आदेशानुसार लवकरच निवड होण्याची शक्यता आहे. अधिसभेच्या विशेष बैठकीसाठी युवा सेनेच्या सर्व अधिसभा सदस्यांनी भगवे फेटे घालत हजेरी लावली होती.

‘नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही मतपत्रिकेवर झाल्यामुळे आम्ही दहापैकी दहा जागा जिंकलो. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभा व विधानपरिषदेतील प्रतिनिधी म्हणून भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची निवड ही नामनिर्देशित आहे. सुशिक्षित पदवीधरांनी आम्हाला विजयाचा कौल दिला आहे. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहोत’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. तसेच, विविध प्राधिकरणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत मतफुटी झाल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने केला आहे. यापुढे विद्यापीठात राष्ट्रीय हितासाठी काम करणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थी संघटनाची ताकद राहणार आहे, असेही अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने स्पष्ट केले.

हेही वाचा : मुंबई : बांगलादेशी घुसखोरांच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न, तीन वर्षांत ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक

विधानसभा व विधान परिषद आमदारांचेही मतदान, भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभेतील प्रतिनिधी म्हणून भाजपचे विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी, शिवसेनेचे (शिंदे गट) कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे मंगेश कुडाळकर आणि विधानपरिषदेतील प्रतिनिधी म्हणून भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे. या अनुषंगाने तिघांनीही मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या विशेष बैठकीसाठी हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university appointments to various authorities announced election process completed in senate special meeting mumbai print news css