मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात सुरू आहे. या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र हा अर्थसंकल्प मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत मंजूर झालेला नसल्याचा दावा ठाकरे गटाची युवा सेना आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्यांनी केला आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करीत ठिय्या आंदोलन केले आहे. परिणामी सभागृहात गदारोळ झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक १५ मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पाचा मुद्दा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या अजेंड्यात नव्हता. अजेंड्यावर मुद्दा नाही मग, तो मंजूर होण्याचा मुद्दाच येत नाही. नियमानुसार अर्थसंकल्पाचा मसुदा हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर सदर अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात येतो. मात्र अर्थसंकल्पाचा मसुदा हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झालेला नाही आणि तरीही हा अर्थसंकल्प अधिसभेच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आल्यास ही नियमांची पायमल्ली ठरेल. या कारभाराविरोधात दाद मागण्यासाठी आम्ही कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे जाऊ’, अशी भूमिका ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल देवरुखकर – शेठ यांनी मांडत संताप व्यक्त केला. यानंतर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे १० आणि ‘बुक्टु’च्या ८ अधिसभा सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करीत आंदोलन करीत घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले आहे.

दरम्यान, ‘मुंबई विद्यापीठाचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पाचा मसुदा मंजूर करून सदर अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत आणलेला आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही’, असे मुंबई विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी अधिसभेत सांगितले.

Story img Loader