दररोज ६० हजार उत्तरपत्रिकांचीच तपासणी; कला-वाणिज्यसाठी आणखी महिन्याचा विलंब

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली सर्व यंत्रणा कामाला लावल्यानंतरही संगणकाधारित ‘ऑनस्क्रीन’ मुल्यांकनाबाबतच्या कुलगुरूंच्या आततायी निर्णयाचे ढिगळ जोडण्यात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला यश आलेले नाही. प्रति दिन फक्त ६० हजार उत्तरपत्रिकाच तपासून होत असल्याने येत्या दहा दिवसात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांचे केवळ ३० ते ४० टक्के परीक्षांचेच निकाल जाहीर करणे विद्यापीठाला शक्य होईल. उर्वरित वाणिज्य आणि कला शाखेतील ६० टक्के परीक्षांच्या निकालांकरिता आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न धुळीला मिळणार आहे.

सर्व विद्याशाखांच्या तब्बल १८ लाख उत्तरपत्रिकांचे एकाचवेळी ऑनस्क्रीन मुल्यांकन करण्याचा विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांचा निर्णय मनमानीच नव्हे तर आततायीही असल्याचे एव्हाना स्पष्ट झाला आहे. ११ हजार शिक्षक असूनही महाविद्यालये सुरू असल्याने दररोज केवळ चार ते साडेचार हजार शिक्षकांकडूनच विद्यापीठाला मूल्यांकनाचे काम करवून घेणे शक्य होत आहे.

‘शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण १० लाख ७४ हजार उत्तरपत्रिकाचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले होते. तसेच पुनर्मुल्यांकनाचेकामही सुरू झाले आहे. आतापर्यंत ४० टक्के पुनर्मूल्यांकनाचे काम झाले आहे,’ अशी माहिती परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३१जुलैपर्यंत फारतर तंत्रज्ञान (अभियांत्रिकी) आणि विज्ञान शाखांच्याच परीक्षांचे निकाल जाहीर करणे शक्य होईल. कारण या शाखांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कला आणि वाणिज्य शाखांतील उत्तरपत्रिकांचे केवळ ५५ ते ६० टक्के इतकेच मूल्यांकन झाले आहे. या सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱ्या शाखांचे निकाल महिनाभर तरी रखडण्याची शक्यता आहे. कारण या शाखांचे मूल्यांकनाचे काम केवळ ५० टक्के इतकेच झाले आहे.

तपासणीचे गणित कोलमडले

शिक्षकांना नोटीसा पाठवून, प्राचार्याकडे, नागपूर, मुक्त विद्यापीठ, स्वायत्त संस्थांकडे मदतीची याचना करत ऑनस्क्रीन मुल्यांकनाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याकरिता परीक्षा विभागाने कंबर कसली असली तरी तब्बल १८ लाख उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनाचे व पुनर्मुल्यांकनाचे गणित सोडविणे मुंबई विद्यापीठाकरिता कठीणच आहे. दिवसाला केवळ ६० हजार उत्तरपत्रिकाच तपासणे शक्य होत आहे. त्यात शनिवार-रविवारी काम केले तरी पुढील ९ ते १० दिवसात सहा ते सात लाखच उत्तरपत्रिका तपासणे शक्य होणार आहे. तर १८ लाखांपैकी सात ते आठ लाख उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन (मॉडरेशन) करावे लागणार आहे. हे काम अनुभवी शिक्षकांकडूनच करून घ्यावे लागते. ते पुरेशा संख्येने उपलब्ध होत नसल्याने धीम्या गतीनेच सुरू आहे. शिवाय मूल्यांकनानंतर  एटीकेटी, सत्रांचे निकाल एकत्र अंतिम निकाल तयार करण्याकरिता तीन ते चार दिवस लागतात.

परिणाम गंभीर

* पदवीचे निकाल लांबल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा झाला आहे. ज्यांना परदेशात, महाराष्ट्रात व राज्याबाहेर इतरत्र पदव्युत्तर शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना आपल्या संधींवर पाणी सोडावे लागले आहे.

* ज्यांना विद्यापीठातच पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष उशीरा सुरू होणार असल्याने अभ्यासाचे नुकसान होणार आहे. अभ्यास उशीराने सुरू झाल्याचा फटका केवळ मुंबईच्याच नव्हे तर इतर विद्यापीठांतून मुंबईत शिकण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.

* विधी, बीएड आदी पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाचे निकाल लांबल्याने रखडली आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष उशीराने सुरू करावे लागणार असल्याने अभ्यासाचा खेळखंडोबाच होणार आहे.

* अनेक ठिकाणी प्राध्यापकांना वर्गावर शिकविण्याऐवजी मूल्यांकनाच्या कामाला वेळ द्यावा लागतो आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय अशा सर्वच वर्षांच्या पदवीच्या विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे गणेशोत्सव वा दिवाळीच्या सुट्टीत जादाचे वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

मुदतीत मुल्यांकन अशक्य

दिवसाला ६० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणे विद्यापीठाला शक्य होत नाही. आता चार दिवस महाविद्यालयात न शिकविता उत्तरपत्रिका तपासण्याकरिता प्राध्यापकांना मुभा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्राचार्याना करीत आहे. परंतु, आपल्या सर्व यंत्रणा कामी लावूनही उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि पुनर्मुल्यांकन राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत म्हणजे ३१ जुलैच्या आत पूर्ण करणे विद्यापीठाला अशक्य आहे.

 

आतापर्यंत झालेले मूल्यांकन

’ तंत्रज्ञान      ९५ टक्के

’ विज्ञान       ९० टक्के

’ वाणिज्य      ६० टक्के

’ कला       ५५ टक्के

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university ba bcom results will announce after one month