मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामधील उन्हाळी सत्रातील ‘बी.कॉम. सत्र ६’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेला मंगळवार, १८ मार्चपासून सुरूवात होत आहे. विद्यापीठाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संलग्नित महाविद्यालयातील २८४ परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ५४ हजार ८९२ विद्यार्थी पात्र आहेत.
‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसह स्वयंअर्थसहाय्यित बीएएमएस, अकाऊंटिंग फायनान्स आणि बँकिंग अँड इन्शुअरन्ससह इतरही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. या सर्व परीक्षांची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उन्हाळी सत्रातील विविध परीक्षांना एकूण ८२ हजार ९९५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये ७३ हजार ३०९ एवढे नियमित विद्यार्थी आणि ९ हजार ६९२ एवढे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच या परीक्षांना एकूण ३९ हजार ६१७ मुली आणि ४३ हजार ३७७ मुलांचा समावेश आहे. तर ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५४ हजार ८९२ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २८ हजार ६११ मुले आणि २६ हजार २७४ मुलींचा समावेश आहे.
‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सर्व परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या बैठका घेतल्या आहेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासह जलदगतीने अचूक मूल्यांकन करून निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन उपस्थिती नोंद, बारकोड व विद्यार्थ्यांची सर्व माहिती असणाऱ्या स्टिकरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे’, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.