मुंबई : मुंबई विद्यापीठात पदवी स्तरावर वाणिज्य शाखेत (बी. कॉम) सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्रातील सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल हा नुकताच जाहीर झाला.
ही परीक्षा ६० हजार २८५ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ७०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ही ३८.३२ टक्के आहे. या परीक्षेस ३ हजार ६९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले असून, २८५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. आतापर्यंत विविध ५३ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.