मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास गेल्याच आठवड्यात झाला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनाने कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी देण्यास सुरुवात केली आहे. तर मुलींच्या नवीन वसतिगृहात पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा सुधारल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागाच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहाचे एक वर्षापूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. परंतु नळजोडणी न झाल्यामुळे वसतिगृहाला तब्बल आठ महिने टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता नळजोडणी करण्यात आली असून मुंबई महानगरपालिकेकडून नियमितपणे पाणीपुरवठा होत आहे. परंतु पाण्याची अधिक गरज भासल्यास टँकरने पाणी मागविले जाते. गेल्या आठवड्यात वसतिगृहातील विद्यार्थिनींना त्रास झाला. त्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने टँकरने आणलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी विद्यापीठाच्या अभियंता विभागाकडे दिले. हे पाणी शुद्ध असल्याचे अभियंता विभागाच्या अहवालात निष्पन्न झाले, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी पालिका अधिकाऱ्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. तसेच महानगरपालिका सध्या संपूर्ण कलिना संकुलातील नळजोडणीची तपासणी करीत आहे. सध्या मुलींच्या नवीन वसतिगृहातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेकडून वसतिगृहाला टँकरनेही पाणीपुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाकडून कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी देण्यात येत आहे.

हेही वाचा : मुंबई महानगरात पहिल्या तिमाहीत ५४ हजार कोटींची घरविक्री! ठाणे, डोंबिवलीत सर्वाधिक मागणी

‘नवीन वसतिगृहातील विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी देण्यात येत आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल’, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती

‘कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याकडे मुंबई विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मी स्वतः कलिना संकुलाला भेट दिली. विद्यार्थिनींनंतर कर्मचाऱ्यांनाही पाण्यामुळे त्रास होऊन ते आजारी पडत आहेत. एखादी गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतरच उपाययोजना करण्यात येते’, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university bottled water for students and staff of kalina campus mumbai print news css
Show comments