मुंबई विद्यापीठातील मंजूर पदांवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शासन दरबारी सादर न केल्याने विद्यापीठाच्या निधीला गळती लागली असून परिणामी विद्यापीठाचा अर्थसंकल्प तुटीत जाऊ लागला आहे.
विद्यापीठाला ३१ मार्च २०११ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत २७ कोटी ११ लाख ९० हजार रुपये नफा झाला होता. हा नफा कमी होत २०११-२०१२ च्या अखेरीस ५ कोटी २६ लाख ७१ हजारावर आला, तर २०१२-१३च्या सुधारित अर्थसंकल्पानुसार चार कोटी ५८ लाख २५ हजार इतकी तूट दाखविण्यात आली आहे. ही तूट वाढतच राहिली आणि २०१३-१४चा अर्थसंकल्प ३७ कोटी २० लाख दोन हजार इतकी अपेक्षित करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाला मिळणारे अनुदान कमी झाल्याने हा फटका बसला आहे. सध्या विद्यापीठाला शासनातर्फे वेतनाचेच अनुदान मोठय़ा प्रमाणात मिळत आहे. वेतनाच्या अनुदानाची रक्कमही २०११ पासून २०१०च्या तुलनेत प्रत्येक विभागनिहाय कमी झाल्याचे अर्थसंकल्पीय अंदाजातून स्पष्ट होत आहे.
कंत्राटदारांना वेळेवर पैसे दिले जात नाही म्हणून काम थांबते व कालांतराने काम सुरू करायच्या वेळेस कंत्राटदार नवे दर देतो आणि या वादात काम आणखी रखडते. अशाच प्रकारे विद्यापीठाच्या ठाणे, रत्नागिरी आणि कल्याण उपकेंद्रातील कामेही तरतूद करूनही सुरू झालेली नाहीत, याकडे युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी लक्ष वेधले. विद्यापीठाला वेगवेगळय़ा ठिकाणाहून आणि विद्यार्थ्यांकडून आलेला निधी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठीच खर्च झाला पाहिजे, असे मत मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा