मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.कॉम.’च्या पाचव्या सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. या परीक्षेत २३ हजार १३४ विद्यार्थी (४१.७५ टक्के) उत्तीर्ण आणि तब्बल ३२ हजार २७९ विद्यार्थी (५८.२५ टक्के) अनुत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजेच अवघ्या १८ दिवसांत जाहीर केला. मुंबई विद्यापीठाच्या ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष पाचव्या सत्र परीक्षेसाठी एकूण ५८ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ हजार ६२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि २३ हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण व ३२ हजार २७९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर २ हजार ७४७ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते.
हेही वाचा >>> वीजदरवाढीची टांगती तलवार, प्रतियुनिट ४० पैसे वाढण्याची भीती; केंद्र सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न
दरम्यान, विविध कारणात्सव २०७ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने सुक्ष्म नियोजन केले होते. परीक्षा संपल्यानंतर जलदगतीने मूल्यांकन करून सहकार्य केल्याबद्दल या प्रक्रियेतील सहभागी सर्व घटकांचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी आभार मानले.