संघटनांची मागणी
मुंबई : आदिवासी मुलीबाबत आक्षेपार्ह उल्लेख असणारी कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्यानंतरही आदिवासी संघटना, विद्यार्थी संघटनांची आंदोलने सुरूच आहेत. त्या कवितेचा अभ्यासक्रमांत समावेश करणाऱ्या समितीवर कारवाई करावी, कवी आणि प्रकाशकांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघटना करीत आहेत.
मुंबई विद्यापीठातील कला शाखेच्या तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली ‘पाणी कसं असतं’ ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कवी दिनकर मनवर यांच्या दृश्य नसलेल्या दृश्यात या कविता संग्रहातील पाणी कसं असतं ही कविता कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांच्या साहित्य आणि समाज या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती. आदिवासी मुलीबाबत या कवितेत आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता. त्यामुळे विद्यापीठाने ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला. परंतु, संघटनांची आंदोलने सुरूच आहेत. कवी, प्रकाशक आणि अभ्यासक्रम समितीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनांनी सोमवारी विद्यापीठाच्या कलिना संकुलात आंदोलन केले.