मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत प्रथम सत्र पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे मूल्यांकन करून संबंधित परीक्षांचे लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी आदी विविध अंतर्गत व बाह्यमूल्यमापनाचे गुण ‘ई – समर्थ’ संकेतस्थळाद्वारे विद्यापीठाकडे सादर करण्यास मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून वारंवार विलंब होत आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडून विलंब होत असल्यामुळे मुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना आता २० फेब्रुवारीपर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर देखील ही प्रक्रिया महाविद्यालयांनी पूर्ण केली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिल्यास महाविद्यालय जबाबदार राहील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली आहे. या अनुषंगाने शिक्षणक्षेत्रात विविध बदल पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ‘डीजी लॉकर’मध्ये असणे अनिवार्य असून त्यासाठी शैक्षणिक श्रेयांक खाते (एबीसी आयडी) आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ‘ई – समर्थ’ संकेतस्थळाद्वारे १० फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठाकडे सादर करण्यास सर्व संलग्न महाविद्यायांना आदेश देण्यात आले होते. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकडे बहुतांश महाविद्यालयांनी सर्रास दुर्लक्ष केले. त्यानंतर माहिती सादर करण्यास १४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक महाविद्यालयांकडून बहुसंख्य विद्यार्थांचे गुण ‘ई – समर्थ’ संकेतस्थळाद्वारे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, सदर गुण सादर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून यापुढे पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे. परिणामी, यानंतरही महाविद्यालयांकडून गुणांची नोंद संकेतस्थळावर झाली नाही आणि या कारणास्तव विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिल्यास त्यासाठी सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार राहील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ‘डीजी लॉकर’मध्ये असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र आदी विविध शैक्षणिक कागदपत्रे ही ‘डीजी लॉकर’मध्ये एकाच ठिकाणी अपलोड केली जातात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक श्रेयांक खाते (एबीसी आयडी) आवश्यक आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, आता महाविद्यालयांना शेवटची मुदत दिली आहे. तसेच, गुरूवार, २० फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेऊन ‘डीजी लॉकर’ व शैक्षणिक श्रेयांक खाते आदी संबंधित प्रक्रियेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.