लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील मे महिन्यात होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु अद्याप नवीन तारखा व सविस्तर वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासह उच्च शिक्षणाचे नियोजन करणे कठीण झाले असून, नवीन तारखा जाहीर करण्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी गोंधळून जावू नये. येत्या २ दिवसांत नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘सध्या विविध अभ्यासक्रमांचे रखडलेले निकाल लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सदर परीक्षा मे महिन्यात होणार नसून, जून महिन्यात घेण्यात येतील. या परीक्षांच्या नवीन तारखा येत्या २ दिवसांत जाहीर करण्यात येतील आणि त्यानंतर काही दिवसांत https://mu.ac.in/examination/timetable-for-summer-2023 या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.
हेही वाचा… “…तर तेव्हाच महाविकासआघाडीचं सरकार पडलं असतं”, अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले…
या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत
मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील मे महिन्यात होणाऱ्या आर्थिक बाजार आणि सेवा, स्थावर मालमत्ता व्यवस्थापन, किरकोळ व्यवस्थापन, पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवस्थापन, आरोग्य, आदरातिथ्य आणि पर्यटन या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तृतीय वर्ष सहाव्या सत्राच्या परीक्षा, पदव्युत्तर कला शाखेतील संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, दूरदर्शन अभ्यास अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या आणि पदव्युत्तर कला शाखेतील समाजशास्त्र (ऑनर्स) अभ्यासक्रमाची पहिल्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.