Maharashtra Weather Alert: गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह काही भागात हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत सरकारी विभागांना व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून सर्व संलग्न विद्यापीठे व विद्यार्थ्यांच्या आज २७ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
काय आहे परिपत्रकात?
मुंबई विद्यापीठानं परीक्षांसंदर्भात माहिती देण्यासाठी एक परिपत्रक बुधवारी जारी केलं आहे. या पत्रकामध्ये आज, अर्थात २७ जुलै रोजी होणाऱ्या सर्व संलग्न विद्यालये व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.
“मुंबई विद्यापीठाचे सर्व विभागप्रमुख, डिस्टन्स लर्निंग इन्स्टिट्युटचे संचालक, रत्नागिरी-ठाणे-कल्याण उपविभागांचे संचालक आणि सर्व संलग्न विद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक यांना माहिती देण्यात येत आहे की २७ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांसाठीच्या नव्या तारखांची घोषणा नंतर केली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना त्यांनी यासंदर्भातली माहिती द्यावी”, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
मुंबईसह-उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई-उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा!
दरम्यान, मुंबई व उपनगरांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांतही अनेक ठिकाणीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.