मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. ‘University Of Mumbai Online Program’ या नावाने बनावट फेसबुक खाते (फेसबुक पेज) आढळले असून या बनावट फेसबुक खात्याद्वारे कोणतीही प्रक्रिया करू नये. याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नावाने असणारे बनावट फेसबुक खाते https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे. या बनावट खात्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाकण्यास सांगितले जाते. ही माहिती भरल्यानंतर वापरकर्त्याला https://www.markmonitor.com/online-com/ या संशयास्पद संकेतस्थळावर वळवले जाते. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत संकेतस्थळ व माध्यमांद्वारेच माहितीची खात्री करून पुढील पाऊल उचलावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे फेसबुक खात्याच्या माध्यमातून कोणतीही प्रवेश प्रकिया राबविली जात नाही, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी अशा बनावट खात्यापासून सावध राहावे आणि संशयास्पद माहिती त्वरित संबंधित यंत्रणांना द्यावी, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती ‘www.mu.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाची अधिकृत समाजमाध्यम खाती

  • फेसबुक : @University of Mumbai
  • इंस्टाग्राम : @uni_mumbai
  • एक्स (पूर्वीचे ट्विटर) : @Uni_Mumbai
  • यूट्यूब : @universityofmumbai_uom
  • व्हॉट्सअप चॅनेल : @University of Mumbai