मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधकांमधील टीका शिगेला पोहोचली होती. निवडणूक स्थगितीचा मुद्दा न्यायालयातही जाऊन पोहोचला. अखेर विद्यापीठाने बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी रविवार, २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती (१), इतर मागास वर्ग (१), महिला (१) आणि खुला प्रवर्ग (५) अशा एकूण १० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सोमवार, ३० ऑक्टोबर ते गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५, या कालावधीत पदवीधरांची मतदार नोंदणी https://mu.ac.in या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर याच संकेतस्थळावर शुक्रवार, १ डिसेंबर २०२३ ते रविवार २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदारयादी (तात्पुरती मतदार यादी, सुधारित मतदार यादी आणि आक्षेप) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर संकेतस्थळावरून सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येईल.
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर ‘लॉगिन/ रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करून सोमवार, ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत भरता येणार आहे.
हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर आजपासून हाल; आठवडाभर दररोज ३१६ फेऱ्या रद्द
विद्यापीठाने निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमासह नवीन मतदार नोंदणीची नियमावलीही जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व पदवीधरांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. त्यामुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नाव नोंदणी केलेल्या विविध विद्यार्थी संघटनांना धक्का बसला आहे.