मुंबई : मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी मतांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप यांना टक्कर देण्यासाठी छात्रभारती, बहुजन विकास आघाडी (वसई) आणि इतर अपक्षांनी वेगळे एक ‘पॅनल’ करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण २८ उमेदवारांपैकी प्रत्येकी १० उमेदवार हे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप या संघटनांचे आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे १, मनसेचे १ राज्य सचिव आणि २ जणांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांना टक्कर देण्यासाठी छात्र भारती, बहुजन विकास आघाडी आणि उर्वरित अपक्षांनी कंबर कसलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन संघटना नेमका कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!

‘अधिसभा निवडणुकीत पसंतीक्रमाला महत्त्व असते. त्यामुळे सर्व अपक्षांना एकत्र करून एक नवीन ‘पॅनल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी सनील मोसेकर म्हणाले, ‘छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांची युती जवळपास निश्चित असून अपक्षांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करू.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘अधिसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे आणि सर्व पर्याय खुले आहेत’.

आणखी वाचा-३० पोपट, तीन कापशी घारी जप्त; भिवंडीजवळ पडघा येथील कारवाईत बसचालक, सहाय्यक अटकेत

ठाकरे गटाच्या युवा सेनेचा प्रचार प्रारंभ; वचननामा प्रसिद्ध

ठाकरे गटाच्या युवा सेनेने अधिसभा निवडणुकीत २०१० साली १० पैकी ८ आणि २०१८ साली सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युवा सेनेने अधिसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचे प्रकाशन करून प्रचाराला सुरुवात केली.

Story img Loader