मुंबई : मुंबई विद्यापीठ प्रशासनाने नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी तात्पुरती मतदारयादी जाहीर केली असून एकूण नोंदणीपैकी ५० टक्के पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तात्पुरत्या मतदारयादीनुसार १३ हजार ३९४ पदवीधरांचे मतदार अर्ज पात्र, तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १३ हजार ५५० पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
निवडणुकीला रातोरात स्थगिती, राजकीय आरोप – प्रत्यारोप आणि न्यायालयातील लढाई आदी विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. नाट्यमय घडामोडींमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदारयादी व अपात्र ठरलेल्या अर्जांची कारणासहित यादी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा – मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
पदवी प्रमाणपत्र व त्यावरील क्रमांक आणि पत्त्यासाठीचा पुरावा अस्पष्ट दिसणे, पदवी प्रमाणपत्र आणि अर्जावरील नाव भिन्न असणे, पदवी प्रमाणपत्रावरील क्रमांक वेगळा असणे, पदवी प्रमाणपत्र आणि पत्त्यासाठीचा पुरावा न जोडणे आदी विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्याने आणि वैयक्तिक माहितीत चुका असल्यामुळे तब्बल ५० टक्के पदवीधरांचा तात्पुरत्या मतदारयादीत समावेश करण्यात आलेला नाही.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी रविवार, २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तात्पुरत्या मतदार यादीतील नाव कसे पहाल?
नोंदणीकृत पदवीधर गटाची तात्पुरती मतदारयादी ही मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील इलेक्शन २०२२ या लिंकवर किंवा https://mu.eduapp.co. in या संकेतस्थळावर ‘इलेक्ट्रोल रोल’ सदराखाली प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच संबंधित पदवीधरांना मोबाइल संदेशाद्वारेही कळविण्यात आले आहे. आपला अर्ज कोणत्या यादीमध्ये आहे हे शोधण्यासाठी ‘Search Registered Graduate Applications’ या टॅबवर क्लिक करावे. तिथे पदवीधरांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकावा आणि आपला अर्ज हा पात्र किंवा अपात्र यादीमध्ये आहे, याची माहिती घ्यावी.
हेही वाचा – मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
मतदार अर्ज अपात्र ठरला, पुढे काय?
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठीच्या तात्पुरत्या मतदारयादीत विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १३ हजार ५५० पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरले आहेत. या पदवीधरांना गुरुवार, २९ फेब्रुवारी ते सोमवार, ४ मार्च या कालावधीत काही वगळलेल्या किंवा चुकीच्या नोंदी निदर्शनास आणून देता येणार आहेत. विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील इलेक्शन २०२२ या लिंकवर किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर स्वत:च्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या ‘ॲड ग्रीव्हन्स’ (तक्रार नोंदविणे) या पर्यायावर क्लिक करावे आणि तेथील रकान्यामध्ये संबधित बाब स्पष्टीकरणासह नोंदवावी. तसेच स्पष्टीकरणासंबंधित आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित जागेवर अपलोड करावीत.