मुंबई : विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. आता नरिमन पॉइंट येथील मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात सोयी-सुविधांची वानवा असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी वसतिगृहाला भेट दिली आणि तेथील सोयी-सुविधांच्या अभावावर प्रकाशझोत टाकला. मात्र ही बाब मुंबई विद्यापीठ प्रशासनाने फेटाळली आहे. प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, तसेच वसतिगृह अधिक्षीका नसताना मुलींच्या वसतिगृहाला पुरुष सदस्यांनी भेट देणे बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.
नरिमन पॉइंट येथील मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात उपाहारगृह व खानावळ सुरळीतपणे सुरू नाही, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, पूर्णवेळ वसतिगृह अधिक्षक नसणे, कोलमडलेली अग्निशमन यंत्रणा, काही मजल्यावर विद्युत यंत्रणा कार्यान्वित नसणे आदी दुरावस्था असल्याचे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य शीतल देवरूखकर-शेठ, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबकर यांनी वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर सांगितले.
दरम्यान, नरिमन पॉइंट येथील मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना सर्व सोयी-सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जात आहेत. विद्युतयंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे आणि कोणतेही छप्पर कोसळलेले नाही. या प्रकाराबाबत अत्यंत धादांत खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली आहे. मुलींच्या वसतिगृहातील खोलीमध्ये पुरुष अधिसभा सदस्यांनी जाऊन पाहणी करणे हे मुलींच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. नियमानुसार वसतिगृहात बाहेरच्या कोणालाही प्रवेश नाही, पुरुषांसाठी प्रवेश वर्जीत आहे. हे अत्यंत बेजबाबदारीचे आणि बेकायदेशीर कृत्य आहे. याची गंभीर दखल विद्यापीठाने घेतली आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
‘मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा मुलींच्या वसतिगृहाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील छप्पर कोसळलेले आहे. तर दोन ते तीन खोल्यांमध्ये अनावश्यक सामान व कचरा ठेऊन विद्यार्थिनींना प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे. व्यवस्थापन परिषद बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे विद्यापीठ विभागातील विद्यार्थिनींना खोली दिल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रिकाम्या खोल्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात याव्यात. परंतु मागील शैक्षणिक वर्षात १९६ पैकी जवळपास १७० विद्यार्थिनी प्रवेशित होत्या, उर्वरित जागांसाठी मागणी असूनही प्रवेश नाकारण्यात आला. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. तरी व्यक्तीशः लक्ष देऊन वसतिगृहाचा कारभार सुधारावा अशी आग्रही मागणी कुलगुरूंना पत्र देऊन केली आहे. तसेच आम्ही मुलींच्या खोलीमध्ये गेलेलो नाही. मात्र वसतिगृहाची दुरावस्था झाल्याचे संपूर्णतः खरे आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्र – कुलगुरू आणि कुलसचिवांनी आमच्यासोबत वसतिगृहाची पाहणी करावी’, अशी मागणी प्रदीप सावंत यांनी केली आहे.