परीक्षेचा दिवस उजाडला तरी हातात प्रवेशपत्र नाही अशी परीक्षा आजवर घडली नसेल. पण मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवेशपत्रांशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा प्रकार सोमवारी घडला. विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन शिक्षण संस्थेतील आणि कणकवलीच्या लक्ष्मीनारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रवेशपत्राविनाच परीक्षा दिली.
परीक्षेचा दिवस उजाडला तरी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांच्या हातात प्रवेशपत्र मिळाले नव्हते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आयत्यावेळी परीक्षा केंद्रांची माहिती मिळाली. सोमवारी त्या परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यावरही त्यांच्याकडे प्रवेशपत्र नसल्याची बाब विद्यापीठातील अधिसभा सदस्यांपर्यंत पोहोचली. यानंतर या प्रकरणी त्यांनी परीक्षा नियंत्रकांना संपर्क साधून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांशिवाय परीक्षेला बसू देण्याची सूचना केली. त्यानुसार परीक्षा नियंत्रकांनी उपाययोजना करून दोन्ही संस्थेतील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच नव्हे तर त्यांच्या प्रवेशावरसुद्धा प्रश्नचिन्ह असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. ही बाब युवा सेनेचे अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यानंतर प्रकुलगुरू नरेशचंद्र आणि परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्या मध्यस्थीनंतर या मुलांच्या प्रवेशपत्राचा प्रश्न सुटला. सोमवारी कणकवली येथील कोंडाजवळच्या लक्ष्मीनारायण महाविद्यालयातील बीएमएसच्या सात विद्यार्थ्यांच्या हातात प्रवेशपत्र मिळाले नव्हते. ही बाब मनविसेचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रवेशपत्र आले नाही म्हणून या विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जातात, त्या वेळेस लगेचच त्यांची प्रवेशपत्रे संगणकप्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन तयार केली जाते. ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरलेले नाहीत. त्यांचे प्रवेशपत्र आले नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.

Story img Loader