मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत यंदापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी ६०-४० गुणांकन पद्धत लागू होणार आहे. पदवी स्तरावरील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ६०-४० या पॅटर्नप्रमाणे मूल्यांकन होईल. त्यानुसार प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा ६० गुणांची (बाह्य मूल्यांकन) असेल आणि ४० गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी (अंतर्गत मूल्यांकन) असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ८९४ महाविद्यालयांत आतापर्यंत काही अभ्यासक्रमांचे १०० गुणांनुसार व काही अभ्यासक्रमांसाठी ७५-२५ अशी गुण विभागणी करून मूल्यांकन होत होते. आता प्रत्येक सत्र परीक्षेसाठी ६० गुण आणि अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० गुण निश्चित करण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प, गृहपाठ प्रकल्प, विविध औद्योगिक व व्यावसायिक भेटी, ऑन जॉब ट्रेनिंग, व्याख्यानांमध्ये उपस्थिती आदी गोष्टींचा अंतर्गत मूल्यांकनामध्ये समावेश असेल. ६०-४० या गुणविभागणीनुसार विद्यार्थ्यांना बाह्य मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यांकन अशा दोन्ही परीक्षांत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. या मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना दिले आहेत.

हेही वाचा…जुन्या वादातून ४८ वर्षीय व्यक्तीचा घरात घुसून खून, मृत बजरंग दलाचा कार्यकर्ता

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ५०-५० अशी गुणविभागणी लागू आहे. यामध्ये प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा ५० गुणांची (बाह्य मूल्यांकन) आणि ५० गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी (अंतर्गत मूल्यांकन) आहेत. दोन्ही परीक्षांत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. यापूर्वी मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी ६०-४० ही गुणांकन पद्धत लागू होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university implements 60 40 scoring system for degree courses mumbai print news psg