मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गतच्या उन्हाळी सत्र परीक्षांना शुक्रवार, २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी आणि तृतीय म्हणजेच शेवटच्या वर्षाला असलेल्या एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव न राहण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्षाचे गुण संबंधित संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी भरणे आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रथम व द्वितीय वर्षाचे गुण संकेतस्थळावर नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने एक परिपत्रक जारी करून दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमाचे तृतीय वर्ष अत्यंत महत्वाचे असते. तृतीय वर्षाचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व सत्र परीक्षांचे गुण विद्यापीठाकडे असणे आवश्यक असते. सदर गुणांची नोंद महाविद्यालयाने विद्यापीठाकडे केली नसल्यास संबंधित विद्यार्थ्याचा तृतीय म्हणजेच शेवटच्या वर्षाचा निकाल राखीव (आरएलइ) म्हणून घोषित होतो. वेळेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत होते आणि त्यांना उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींना मुकावे लागते. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी सर्व अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व सत्र परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीद्वारे mum.digitaluniversity.ac व muexam.mu.ac.in/lowerexam/ या संकेतस्थळावर परीक्षेच्या आधी भरणे आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>म्हाडाच्या प्रस्तावातून वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर वसाहत वगळल्याने रहिवाशी नाराज!
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गतची तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र ६ ची परीक्षा २२ मार्च, तृतीय वर्ष बी.ए. व बी.एस्सी. सत्र ६ ची परीक्षा ३ एप्रिल, बी.ए.एमएमसी सत्र ६ ची परीक्षा १६ एप्रिल, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, आयटी व बायोटेक सत्र ६ ची परीक्षा १९ एप्रिल आणि बी.कॉम.अंतर्गत स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रम असणाऱ्या फिनांशियल मार्केटस, बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग ॲण्ड फायनान्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, फिनांशियल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट व बी.एम.एस. सत्र ६ ची परीक्षा ही १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. परीक्षांच्या तारखांसह पदवी परीक्षेच्या सत्र ६ च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. उन्हाळी सत्राअंतर्गत मानव्य विद्याशाखा व विधी शाखेच्या ६९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ आणि आंतर विद्याशाखेच्या ९८ परीक्षा होणार आहेत. उन्हाळी सत्रातील या विविध परीक्षांना २ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.