|| नीलेश अडसूळ
नेहरू ग्रंथालयाच्या इमारतीची अवस्था बिकट; देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव
मुंबई : वर्षभरात झालेली पडझड आणि यंदाचा पाऊस यांमुळे मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. शिवाय देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे धूळखात पडलेल्या या पुस्तकांची विद्यापीठाला गरज आहे की नाही, असा प्रश्न पडतो. ग्रंथालयाची नवी इमारत उभारून तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ती विनावापर पडून आहे.
अडीच लाख दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह असलेल्या ग्रंथालयातील भाषा विभागाला २०१८ला पडझड झाल्याने टाळे लागले. दोन वर्षांत डागडुजी करायचे आश्वासन देऊनही विभागाची परिस्थिती जैसे थे आहे. काही महिन्यांपूर्वी पहिल्या मजल्यावरील ग्रंथशास्त्र विभागही सततच्या पडझडीमुळे बंद करण्यात आला. या विभागातील ६० हजार पुस्तकांचे अस्तित्वही धोक्यात आहे. यंदाच्या पावसात त्यात अधिकच भर पडली. ताडपत्री लावून विद्यापीठाने तोंडदेखली मलमपट्टी केली असली तरी विविध ठिकाणांहून होणारी पाण्याची गळती आणि पडझड याचा परिणाम पुस्तकांवर झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली. यात ब ऱ्याच पुस्तकांचे नुकसान झाल्याचे समजते. चार विभागांपैकी दोन विभाग पूर्णत: दुरवस्थेत आहेत. त्यातील एका विंगची डागडुजी आठ वर्षांत झालेलीच नाही. ‘जागा नसल्याने या विभागांमधील पुस्तके हलविता येत नाहीत. पुस्तके त्या त्या विषय विभागांना द्यायचे ठरविले तर ती सांभाळण्याची जबाबदारी शिक्षकांवर येईल. म्हणून तेही पुढाकार घेत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
एकूण ग्रंथसंपदा
विद्यापीठात कालिना आणि फोर्ट असे दोन्ही संकुल मिळून एकूण ७ लाख ९२ हजार १८ इतकी ग्रंथसंख्या आहे. याव्यतिरिक्त ११,६६८ संदर्भग्रंथ, विविध विषयांवरील ७८ हजार जर्नल्स, २१,६७२ प्रबंध, आणि ९,९०० दुर्मीळ ग्रंथ अशी एकूण ९ लाखांहून अधिक साहित्यसंख्या आहे. त्यापैकी ४ लाख पुस्तके कालिना येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात आहेत तर उर्वरित पुस्तके फोर्ट येथील रिसर्च सेंटर या मुख्य ग्रंथालयात आहेत.
ग्रंथालयाच्या डी विंगचे काम सुरू झाले आहे. परंतु इतर ठिकाणी झालेली पडझड, पुस्तकांचे व्यवस्थापन, ग्रंथालय शास्त्र विभागातील मुलांची बैठक व्यवस्था याबाबत नियोजनाचे विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. पुस्तकांची अवस्था बिकट असली तरी ती हलवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आहे त्या जागेत ग्रंथ जोपासण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवी इमारत तयार असली तरी त्याबाबत अभियंता विभाग अधिक स्पष्टपणे सांगू शकेल.
– बी. के. आहिरे. प्रभारी ग्रंथपाल