मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या परीक्षेला (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) मंगळवार, १४ जानेवारी २०२५ पासून सुरुवात झाली. मात्र पदव्युत्तर स्तरावरील एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा प्रवेशपत्रच (हॉल तिकीट) प्राप्त झाले. या भोंगळ कारभारामुळे मंगळवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच आसन व्यवस्थेबाबतही स्पष्ट माहिती नसल्यामुळे आणि परीक्षा केंद्रांवर ऐनवेळी विविध सूचना देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

दरम्यान, काही विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री ११, तर काही विद्यार्थ्यांना रात्री १२ नंतरही प्रवेशपत्र पात्र प्राप्त झाली. त्यामुळे किती विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही आणि त्यांना परीक्षेला मुकावे लागले? किती विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचलेच नाही? याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत असून शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती त्यांना ग्रासत आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे.‘आयडॉलच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांचे प्रवेशपत्र आम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी आम्ही दिवसभर वारंवार संकेतस्थळ पाहत होतो. मात्र आता परीक्षेच्या अदल्या दिवशी सोमवारी रात्री उशीरा संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले. मात्र प्रवेशपत्रासंदर्भातील विस्कळीत नियोजनामुळे विद्यार्थी गोंधळलेल्या मनःस्थितीत आहेत’, असे एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा…Mumbai Crime : विवाहबाह्य संबंध आणि दुसऱ्या बाईपासून मूल असल्याचा पत्नीचा आरोप, पतीविरोधात गुन्हा दाखल; मुंबईतली घटना

‘पुन्हा एकदा आयडॉलचा भोंगळ कारभार समोर आला आहे. हा विस्कळीत कारभार पाहून आयडॉलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याची कुलगुरूंकडे गेल्या वर्षभरापासून मागणी करीत आहोत. मात्र या मागणीकडे सरार्स दुर्लक्ष केले जात आहे. विद्यापीठाला परीक्षांचे गांभीर्य आहे की नाही? हा विस्कळीत कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा…हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती

कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे प्रवेशपत्रास विलंब – आयडॉल

मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’अंतर्गत सकाळच्या सत्रात आयोजित एम.ए. आणि एम.कॉम., तर दुपारच्या सत्रात एम.एस्सी.च्या प्रथम सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही परीक्षांना एकूण ५ हजार ८१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली होती. या प्रवेश प्रक्रियेत सुमारे ६८३ एवढ्या विद्यार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे जमा केले नव्हती, तसेच वारंवार अशा शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देऊनही विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत आणि अशा विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ न शकल्यामुळे प्रवेशपत्र तयार करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोमवारी रात्री उशिरा या परीक्षांचे प्रवेशपत्रे तयार करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये, टेलिग्राम टेलिग्राम खात्यावर आणि मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. दोन्ही सत्रातील या परीक्षा सुरळीत पार पडल्या, असे ‘आयडॉल’चे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले.

Story img Loader