सदोष व संथपणे काम करणारे संकेतस्थळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचा पहिल्याच वर्षी पार बोऱ्या वाजला आहे. या गोंधळामुळे १० जूनला जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी ११ जूनपर्यंत पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे.
आश्चर्य म्हणजे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनाही वेठीस धरणाऱ्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेवर गेले आठवडाभर प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठूनही विद्यापीठ ऑनलाइनचेच घोडे पुढे दामटवते आहे. त्यामुळे, ऑनलाइन नोंदणीचा गोंधळ निस्तारण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा होत चालला असून औषधापेक्षा आजार परवडला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नाही म्हणायला ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवून विद्यापीठ विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. पण, विद्यापीठाने दिलेल्या मुदतवाढीची सूचनाच महाविद्यालयांना देण्यात न आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले जात आहेत. आता नोंदणी अर्जाशिवाय प्रवेश अर्ज स्वीकारण्यास हरकत नाही. पण, प्रवेश देतेवेळी नोंदणी अर्ज जमा करून घ्यावा, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत. तसेच, प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदतही १० जूनऐवजी ११ जून रोजी दुपारी १.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, १० जूनला जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी आता ११ जूनला सायंकाळी ६ वाजता जाहीर होईल. पावसामुळे पहिल्या गुणवत्ता यादीची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ऑनलाइन नोंदणीच्या गोंधळामुळेच विद्यापीठाचे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळापत्रक कोलमडले आहे.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीची जबाबदारी महाविद्यालयाची असते. पण, प्रवेश निश्चित होण्याआधीच विद्यापीठाने ऑनलाइन नोंदणीचे पिल्लू सोडून आतापर्यंत सुरळीतपणे चालत आलेल्या प्रवेश प्रक्रियेची पार वाट लावून ठेवली आहे. ‘महाराष्ट्र नॉलेज कॉपरेरेशन’ने (एमकेसीएल) ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यापीठाला उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ सदोष असल्याने गेले आठवडाभर विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होतोच आहे. पण, ऑनलाइन नोंदणीबाबत पुरेशी माहिती व प्रशिक्षण प्राचार्यानाही दिले न गेल्याने त्यांच्यातही गोंधळाचे वातावरण आहे. नोंदणीसाठी ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन विद्यार्थ्यांना शनिवापर्यंत आपले अर्ज संबंधित महाविद्यालयांमध्ये सादर करायचे होते. पण, अनेक विद्यार्थ्यांना संथ संकेतस्थळामुळे माहिती भरून प्रिंटआऊट काढता न आल्याने शनिवापर्यंत अर्ज भरणे शक्य नव्हते. त्यामुळे, विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (१०जून) सकाळी १०पर्यंत वाढविली आणि दुपारी ३पर्यंत प्रिंटआऊटसह अर्ज सादर करण्याच्या सूचना महाविद्यालयांसाठी काढल्या. परंतु, अनेक महाविद्यालयांपर्यंत या सूचना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे, सोमवारी अनेक महाविवद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले. ‘प्रवेशासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या दाखवून मुदतवाढीची माहिती करून दिली. तेव्हा कुठे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले,’ असे ठाण्यातील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने सांगितले. संकेतस्थळामधील दोष तर इतकी ओरड करूनही दूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, विद्यार्थी अर्धवट व चुकीची माहिती भरलेले नोंदणी अर्ज प्रवेश अर्जासोबत जोडत आहेत, असे दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले. तर प्रत्येक महाविद्यालयातच नव्हे तर एका महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठीही नोंदणी अर्जाचे वेगवेगळे प्रिंटआऊट जोडायचे आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने त्यांना आम्हाला परत पाठवावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया मध्य मुंबईतील एका नामवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यानी दिली.
रायगड, रत्नागिरी या भागातील महाविद्यालयांचा तर प्रश्न वेगळाच आहे. एकतर आम्हाला ऑनलाईन नोंदणीबाबत वेळेत कळविण्यात आले नाही. त्यातून पावसामुळे गेले आठवडाभर आमच्याकडील इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. इथल्या आजुबाजूच्या दहा गावात मिळून एकही सायबर कॅफे नाही. अशा परिस्थितीत आमच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची कशी, असा सवाल देवगडमधील एका
संस्थाचालकांनी केला.
पावसाचे कारण देण्याचे प्रयोजन काय?
ऑनलाइन गोंधळामुळे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत विद्यापीठाने १० जूनऐवजी ११ जूनपर्यंत वाढविली. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांना कळविण्यात आले. परंतु महाविद्यालयांना त्याची कल्पनाच विद्यापीठाने दिली नाही. तसेच ११ जूनला दुपारी दीडपर्यंतचीच वेळ त्यासाठी दिली गेली. म्हणजे जे विद्यार्थी सकाळी वृत्तपत्रे वाचणार नाहीत त्यांना ही बातमी कळणारच नाही. त्यातही मुदत वाढविण्याचे कारण देताना विद्यापीठाने मखलाशी केली. पावसाचे कारण त्यासाठी देण्यात आले. परंतु रविवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी चांगलीच उघडीप दिली. काही ठिकाणी तर उनही पडले. असे असताना ‘ऑनलाइन गोंधळा’चे कारण लपवत पावसाचे कारण देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university online admision mess continue
Show comments