मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही विद्यार्थी महाविद्यालयांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरतात आणि विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, प्रवेश प्रक्रियेच्या वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे, पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाच्या https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर अर्ज करणेही बंधनकारक आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा: मुंबई: रस्ते कामांसाठी आता १० जूनची अंतिम मुदत, पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश
मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया ही ई समर्थ संकेतस्थळावर सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्या महाविद्यालयांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरणेही बंधनकारक आहे. तसेच, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ही प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर जाहीर करावी. याबाबत महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली. विद्यार्थ्यांना https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर १० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.