मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर द्वितीय वर्ष एम. ए. तृतीय सत्राच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाचे प्रश्न आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. केवळ विद्यापीठाच्या चुकीमुळे दुपारी २.३० ते सायंकाळी ७ असे तब्बल साडेचार तास परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना थांबावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पदव्युत्तर द्वितीय वर्ष एम.ए. तृतीय सत्र परीक्षा २२ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येत आहे. शुक्रवार, १ मार्च रोजी ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ (फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया) या विषयाची परीक्षा होती. मात्र प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ (इंडियाज नेबरहूड पॉलिसी) या विषयाचे होते. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर सायंकाळी ४.३० वाजता विद्यार्थ्यांना सुधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे, अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

हेही वाचा >>>वित्तीय तूट आटोक्यातच; अनावश्यक खर्चावर नियंत्रण, तुटीच्या अर्थसंकल्पावर अजित पवार यांचा दिलासा

‘विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करीत असतात, परंतु सर्व अधिकारी व शिक्षक झोपेत प्रश्नपत्रिका तयार करीत आहेत का, ‘बारकोड’विना परीक्षा घेतल्यानंतरही प्रशासनाला जाग कशी येत नाही. आता कुलगुरूंनी परीक्षेच्या कामकाजात गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे’, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केले.

तांत्रिक कारणास्तव चुकीची प्रश्नपत्रिका

विद्यार्थ्यांना काही तांत्रिक कारणास्तव ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयाचा परीक्षेला ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाकडून अर्ध्या तासाने महाविद्यालयांना सुधारित प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळही देण्यात आला, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university post graduate ma 3rd semester exam students upset over wrong questions mumbai amy