मुंबई : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) मंगळवार, ९ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा ‘आयडॉल’ने जाहीर केल्या आहेत.
‘आयडॉल’ने जाहीर केलेल्या सुधारित तारखांनुसार एफ. वाय. बी. ए. आणि एफ. वाय. बी. कॉम. प्रथम सत्र परीक्षा १८ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २, एफ. वाय. बी. एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द्वितीय सत्र परीक्षा १८ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३०, एफ. वाय. (बॅचलर ऑफ अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स) प्रथम सत्र परीक्षा आणि एफ. वाय. बी. एस्सी. कम्प्युटर सायन्स द्वितीय सत्र परीक्षा १८ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३०, एम. एम. एस. द्वितीय सत्र परीक्षा २० जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होईल. तसेच, परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला असला तरी परीक्षेची वेळ व परीक्षा केंद्रात कोणताही बदल झालेला नाही, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा…“मुंबईकरांनो, गरज असेल तरच प्रवास करा”, मध्य रेल्वेचं आवाहन; मुंबईत आज रेड अलर्ट!
दरम्यान, विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.