मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत उन्हाळी सत्रातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे ६, ७ आणि १३ मे रोजी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. सुधारित तारखांनुसार ६ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या १८ मे, ७ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या २५ मे आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या ८ जून रोजी घेण्यात येणार आहेत. तर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला असला तरी परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्यात पार पडत आहे. मुंबई विद्यापीठाचे परिक्षेत्र मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांत येते. या परिक्षेत्रातील रायगड आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान ७ मे रोजी, मावळ लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान १३ मे रोजी आणि पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान २० मे रोजी होणार आहे.

हेही वाचा…मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास

या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विधि महाविद्यालयांच्या, तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर २० मे रोजी कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियोजित नव्हत्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university postpones exams due to lok sabha elections new dates announced mumbai print news psg
Show comments