मुंबई : गेल्या काही दिवसांपासून परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रे, रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी संघटनांकडून मुंबई विद्यापीठ प्रशासनावर सडकून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या काळातही प्राध्यापकांकडून मूल्यांकनाचे काम सुरू आहे आणि प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे रखडलेले सर्व निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी स्पष्ट केले.
२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्राचे आतापर्यंत २५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर सोमवारी रात्रीपर्यंत एकाच दिवशी १३ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.
करोनाकाळात मुंबई विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या होत्या. करोनानंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्रात प्रथमच विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या. मनुष्यबळाची कमतरता, विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप व विविध कारणांमुळे हिवाळी सत्राचे निकाल विलंबाने लागले, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी कलिना संकुलात प्रत्यक्ष बैठक घेऊन विविध शाखांचे अधिष्ठाता, परीक्षा विभागातील अधिकारी, ‘सीसीएफ’ विभागातील अधिकारी व कर्मचारीवर्ग यांना उन्हाळी सत्राच्या निकालाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले असून, हे निकाल वेळेवर जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर पदवी स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले असून, http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील.