आठवडय़ाची मुलाखत दिनेश कांबळे
प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठात तीन महिन्यांपासून ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यपालांनी नियुक्त उच्चपदस्थांना सक्तीच्या रजेवर पाठवून प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू आणि प्रभारी परीक्षा नियंत्रक यांची नियुक्ती केली. यातच विद्यापीठाचे प्रशासकीय कणा असलेले कुलसचिव एम. ए. खान यांची नियुक्ती अल्पसंख्याक आयोगावर झाल्यामुळे त्यांनाही पदत्याग करावा लागला. या सर्व पाश्र्वभूमीवर विद्यापीठातील अनुभवी उच्चपदस्थ अधिकारी दिनेश कांबळे यांची प्रभारी कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील आणीबाणीवर कोणत्या मार्गाने तोडगा काढतील याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत..
* विद्यार्थ्यांच्या निकालापासून ते रखडलेल्या प्रशासकीय कामांचे आव्हान पेलायचे आहे?
सध्या विद्यापीठात आणीबाणीची स्थिती आहे. यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यांना विश्वासात घेण्याचे महत्त्वाचे काम मी सर्वप्रथम करणार आहे. निकाल हा कुलसचिवांच्या कार्यकक्षेतला भाग नसला तरी विद्यापीठाचा जुना अधिकारी या नात्याने विद्यापीठाचे गतवैभव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यासाठी मी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करत आहे. अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना सध्याच्या परिस्थितीतून विद्यापीठाला बाहेर काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गेली २५ वर्षे विद्यापीठात काम केल्यामुळे विद्यापीठाच्या सर्व घटकांशी माझे जवळचे संबंध आहेत. त्याचा वापर करून मी सर्व अधिकारी आणि संबंधित घटकांशी जुळवून घेऊन विद्यापीठासमोर उभ्या ठाकलेल्या या आव्हानाचा सामना करणार आहे. याचबरोबर कुलसचिवांची प्रलंबित कामेही मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. मला जेवढा काळ सेवेची संधी मिळेल त्या काळात मी सद्य:स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार असून त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.
* विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचेही आव्हान आहे. यासाठी तुम्ही काय तयारी करत आहात.
माझ्याकडे विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिसभा निवडणुका घेणाचा पूर्वानुभव आहे. यामुळे त्या अनुभवाचा वापर करून यंदाच्या निवडणुकांमध्ये कोणतीही गोंधळ होणार नाही. तसेच सर्वाना समान न्याय मिळेल, यासाठी माझा विशेष प्रयत्न राहील. निवडणुकीची सर्व प्रक्रिया पारदर्शक असेल. या कामाच्या संदर्भातील आढावा घेतला असून येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा माझा मानस आहे. यामुळे विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांना पुरेसा वेळ मिळेल.
* विद्यापीठात रिक्त पदे भरण्यासाठी काही योजना आहे का? कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी कसा लागेल?
उत्तर – शासनस्तरावर झालेल्या पहिल्या बैठकीत विद्यापीठातील रिक्तपदांबाबत चर्चा झाली असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय पाहता येणार आहे. गेली अनेक वर्षे विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नी भावनिक निर्णय न घेता विद्यापीठाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून भविष्यात या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
* कुलसचिव म्हणून तुम्ही कोणते वेगळे काम करण्याचा निर्धार केला आहे.
* विद्यापीठाचे भौगोलिक कार्यक्षेत्र हे खूप मोठे आहे. यामुळे विद्यापीठाने यापूर्वी कल्याण, ठाणे आणि रत्नागिरी येथे उपकेंद्रे सुरू केली आहेत. यातील ठाणे व रत्नागिरी येथील उपकेंद्र बऱ्यापैकी कार्यान्वित झाले आहे. मात्र कल्याण येथील उपकेंद्रात काही महत्त्वाची कामे बाकी आहेत. ही कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल. याचबरोबर नव्याने झालेल्या पालघर जिल्’ाातही उपकेंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे. यापूर्वी वसई किंवा विरार येथे हे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यावर पुढे काही होऊ शकले नाही. आता पालघर हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आल्याने पालघर येथे हे केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे. या भागातीलच लोकांच्या सहकार्याने या भागात लवकरात लवकर उपकेंद्र सुरू करण्याचा माझा प्रयत्न असेल. जेणे करून या भागातील विद्यार्थ्यांची फरफट थांबेल.
मुलाखत : नीरज पंडित