राज्यपालांकडून झालेली कानउघाडणी, विद्यार्थी-प्राध्यापक संघटनांचा दबाव आणि राजकीय वर्तुळातून झालेली टीका या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन परिषदेने’ शनिवारी रात्री उशिरा जाहीर केला. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत तब्बल दहा तास चाललेल्या या बैठकीला ‘प्रदीर्घ’ चर्चेची मलमपट्टी लावत आणि ‘विद्यार्थिहिता’चे कारण देत हातेकर यांचे निलंबन रद्द करण्यात आले असले तरी त्यांची विभागीय चौकशी करण्याचेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.
बेशिस्तीचा ठपका ठेवून हातेकर यांना निलंबित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. मात्र, त्याबद्दल कुलगुरू आणि प्रशासनाला मोठय़ा रोषाला तोंड द्यावे लागले. राज्यपालांनीही यावरून कुलगुरूंची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती.  त्यात हातेकर यांचे निलंबन रद्द करण्याच्या ठरावावर २० पैकी १० सदस्यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
निलंबन मागे घेतल्यानंतर डॉ. हातेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी. जी. देशपांडे यांच्या मार्फत विभागीय चौकशी केली जाईल. नैसर्गिक न्यायाला धरून या समितीसमोर हातेकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.
समाधानी, पण..
माझ्यावरील निलंबनाची कारवाई बेकायदेशीरच होती. त्यामुळे, ती रद्द झाल्याने मी समाधानी आहे. पण, मी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे अद्याप समाधानकारक उत्तर मला मिळालेले नाही. ते जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत माझे समाधान होणार नाही.
डॉ. नीरज हातेकर

Story img Loader