शिक्षणमंत्री ‘बोगस’ तावडे आणि कुलगुरुंच्या षडयंत्रामुळे मुंबई विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले अशा शेलक्या शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाजपवर टीका केली. कुलगुरु डॉ. संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर या तिघांनाही तात्काळ पदावरुन हटवावे अशी मागणीही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे पदवी परीक्षांचे निकाल ऑगस्ट उजाडला तरी जाहीर झाले नाही. निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टपर्यंतची मुदतही अपुरी पडणार असल्याचे समोर आले असून वाणिज्य आणि विधि परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडेल, अशी कबुलीच खुद्द मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने विद्यापीठाबाहेर आंदोलन केले.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे आणि कुलगुरुंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय निरुपम यांनी विनोद तावडेंचा उल्लेख ‘बोगस’ तावडे असा करत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. कुलगुरु आणि शिक्षण मंत्र्यांनी षडयंत्र रचल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले. कुलगुरु देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि उच्च व तंत्र शिक्षण ​विभागाचे राज्यमंत्री रविंद्र वायकर या तिघांनीही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीच त्यांनी केली. कुलगुरुंनी मोठा घोटाळा केला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधीत कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फक्त खोटे बोलत असून ते निकालातील विलंबासाठी जबाबदारी असलेल्यांवर कारवाई करत नाही याकडेही निरुपम यांनी लक्ष वेधले. कुलगुरु देशमुख हे संघाशी संबंधीत आहे आणि संघाचा माणूस असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे असा दावा त्यांनी केला. संघाच्या दबावामुळे मुंबई आणि राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना हा ढोंगी पक्ष असून ते स्वतः सत्तेत आहे. त्यांच्याच सरकारने विद्यार्थ्यांचा खेळ मांडला आहे. शिवसेनेला लाज असेल तर त्यांनी तात्काळ सरकारमधून बाहेर पडावे असे आव्हान निरुपम यांनी दिले. काँग्रेसपूर्वी मनसेनेही विद्यापीठाबाहेर आंदोलन केले. ‘विद्यापीठ प्रशासनावर भरवसा नाही’ असा फलक हाती घेऊन मनसेने आंदोलन केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university results delay congress sanjay nirupam protest at kalina demands resignation of vinod tawde