कुलगुरूंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाणिज्य आणि विधि परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडेल, अशी कबुलीच खुद्द मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. त्यामुळे राज्यपाल व कुलपती चे. विद्यासागर राव यांनी वाढवून दिलेल्या ५ ऑगस्टपर्यंतच्या मुदतीमध्ये सर्व निकाल जाहीर होणार नाहीत, हे उघड झाले आहे. दरम्यान, लाखो पदवीधरांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लावणाऱ्या विद्यापीठ आणि कुलगुरूंविरोधात वातावरण तापत असून रोज एक विद्यार्थी संघटना आंदोलने करीत आहेत. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना सरकारने पदावरून हटवावे, अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे रखडलेले पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टपर्यंतची मुदतही अपुरी पडणार आहे. मंगळवारी दिवसभरामध्ये १५,११३ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून १२,८१८ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन झालेले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधि, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या शाखांच्या एकूण २,८६,१३१ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अद्यापही शिल्लक आहे. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे २,३८,८७६ इतक्या उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेच्या असून त्याखालोखाल विधी शाखेच्या २९,९४१ उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. त्यामुळे विधी आणि वाणिज्य या महत्त्वाच्या शाखांचे निकाल १५ ऑगस्टपर्यंत रखडणार आहेत, असे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले आहे.

वेळेत निकाल जाहीर करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या विद्यापीठाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधान भवन परिसरात  मंगळवारी आंदोलन केले. कुलगुरूंच्या हेकेखोर भूमिकेमुळे विद्यापीठाचे निकाल ऑगस्ट महिना उजाडला तरी रखडले आहेत. तेव्हा याची नैतिक जबाबदारी स्वीकारत कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अविभापने केली आहे. कुलगुरूंनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा अविभाप अधिक आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा कोकण प्रदेशमंत्री प्रमोद कराड यांनी दिला. राज्यपालांनी दिलेली मुदत संपुष्टात आली तरी विद्यापीठाच्या  उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. तेव्हा विद्यापीठ परीक्षेमध्ये नापास झाले आहे, अशा घोषणा देत युवासेनेने विद्यापीठाच्या कलिना परिसरामध्ये मंगळवारी आंदोलन केले.

लाखो पदवीधरांचे प्रवेश गुणपत्रिकेअभावी रखडले आहेत. तेव्हा गुणपत्रिका देण्याची तारीख विद्यापीठाने घोषित करावी, अशी मागणी या वेळी युवासेनेने केली. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केंद्रे विद्यापीठामध्ये उभारली आहेत.

तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात येणारे शुल्क कमी करण्याबाबत संबंधित यंत्रणेसोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी या वेळी दिल्याचे युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सांगितले. स्टुडंट फेडरेशनऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनीही विद्यापीठाविरोधात निषेध नोंदवीत आंदोलन केले आहे. यासोबतच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेनेही या आंदोलनात उडी घेतली आहे.

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या अट्टहासामुळे रखडलेल्या निकालांबाबतचा जाब विचारण्यासाठी विद्यापीठाच्या कलिना परिसरात मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी १२ वाजता कलिना परिसरात विद्यापीठाविरोधात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.