मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या खाणावळींमधील अस्वच्छता व खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या गलथान कारभाराविरुद्ध वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे, मात्र अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. ही विदारक परिस्थिती असताना वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने बनविलेली नियमावली जाचक ठरत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वसतिगृह अधिक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय थेट प्रसारमाध्यमांशी संवाद साधता येणार नाही व पोलिसांकडेही तक्रार करता येणार नाही, असे नियमावलीत नमूद केले आहे. एकीकडे विद्यापीठ प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नाही आणि दुसरीकडे प्रसारमाध्यमांकडे जाण्यासही बंदी घालण्यात आल्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील व इतर ठिकाणी असणाऱ्या वसतिगृहांची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वसतिगृहांतील खाणावळींमध्ये अस्वच्छतेचे वातावरण असून कर्मचारी स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळत नाहीत. विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, माशी आढळल्याचे प्रकारही घडले. तसेच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वसतिगृहाच्या खानावळीमधील अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी नेले होते आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही खानावळीची पाहणी केली आहे. परंतु, तरीही वसतिगृहांतील खाणावळींमध्ये सुधारणा झालेली नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीतील नियम क्रमांक ११ नुसार वसतिगृहातील कोणताही विद्यार्थी वसतिगृह अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय पोलीस आणि प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नाही. तसेच पोलीस व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पूर्वपरवानगीशिवाय वसतिगृहाच्या आतमध्ये येऊ शकत नाही. नियम क्रमांक १२ नुसार विद्यार्थी हा थेट कुलगुरू, प्र – कुलगुरू, कुलसचिव आणि पोलिसांकडे तक्रार करू शकत नाही. विद्यार्थ्याने वसतिगृह अधीक्षकांच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. दरम्यान, नियम क्रमांक १३ नुसार विद्यार्थी व प्रशासनामधील अधिकाऱ्यांमध्ये संपर्काचा दुवा असणारी विद्यार्थ्यांची पाच सदस्यीय ‘वसतिगृह नियामक शिस्तपालन समिती’ (एचआरडीसी कमिटी) विद्यापीठ प्रशासनाकडून नेमण्यात येईल. परंतु ही समितीच विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये नसल्यामुळे प्रश्न व समस्या मांडायच्या कोणाकडे ? असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलणे आणि पोलिसांकडे तक्रार करणे, हे आमचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. आम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी जेव्हा आम्ही वसतिगृह अधीक्षक, कुलसचिव, प्र – कुलगुरू, कुलगुरू यांच्याकडे पत्रव्यवहार करतो किंवा संवाद साधतो, तेव्हा कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. वसतिगृह अधीक्षकही प्रभारी आहेत. विविध वसतिगृहांमध्ये एचआरडीसी कमिटी नाही, अधिसभेत नोंदणीकृत पदवीधर गटाचे सदस्य नाहीत, त्यामुळे व्यथा मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवर नियम लादण्यापेक्षा वसतिगृहांच्या विदारक परिस्थितीमध्ये सुधारणा करावी. खाणावळींमधील अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावे. वसतिगृहांसह कलिना संकुलातील विविध इमारतींना निवासी प्रमाणपत्र (ओसी) नाही, खानावळी चालकांकडे आवश्यक सर्व परवाने नाहीत, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : मुंबई: ब्लाॅक कालावधीत टप्पा वाहतूक
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींचे निवारण व्हावे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या सर्व वसतिगृहांसाठी पंधरा दिवसांपूर्वीच एका मुख्य अधीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे मुख्य अधीक्षक सर्व वसतिगृहांच्या अधीक्षकांच्या संपर्कात राहतील व विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मदत करतील. मुख्य अधीक्षक कलिना संकुलात राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी उपलब्ध असतील. तसेच प्रत्येक वसतिगृहाचे अधीक्षक आवश्यक सर्व समितींची स्थापना करतील. प्रभारी वसतिगृह अधीक्षक विद्यापीठाचे पूर्णवेळ शिक्षकच आहेत. विद्यार्थ्यांना काही तक्रारी असल्यास त्यांनी वसतिगृह अधीक्षक, मुख्य अधीक्षक, कुलसचिव, प्र – कुलगुरू, कुलगुरू यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्या तक्रारी निश्चितच सोडविल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन व तक्रारी मांडण्यासाठी आखून दिलेल्या यंत्रणेचे अनुसरण करणे बंधनकारक असेल. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना थेट प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही, पोलिसांकडेही तक्रार करता येणार नाही.
डॉ. बळीराम गायकवाड (प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ)