न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार, मात्र विद्यापीठ प्रशासन, संबंधित उमेदवाराला नोटीस
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. मात्र, नवी मुंबईस्थित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मजमोजणी केंद्रात युवा सेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या अधिकृत निवडणूक प्रतिनिधीऐवजी दुसरीच व्यक्ती उपस्थित होती, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मतमोजणी सुरू असतानाच शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, या केंद्रातील मजमोजणी स्थगित करून भोईर यांची मते रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र शेवटत्या क्षणी मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट करून अभाविपची मागणी फेटाळली.
हेही वाचा >>> महानगरपालिकेतर्फे आजपासून भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण; माहिती नोंदवण्यासाठी ऑनलाइन ॲप्लिकेशनची सुविधा
त्याचवेळी, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवाराला नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना त्यात हस्तक्षेप करणे किंवा तिला स्थगिती देणे योग्य होणार नाही, असेही न्यायालयाने अभाविपला दिलासा नाकारताना प्रामुख्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या मतमोजणी केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्याने मतमोजणीनंतर भोईर यांना विजयी उमेदवार घोषित केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मतमोजणीच्या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार भोईर यांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी स्वप्नील सरवदे होते, मात्र, त्यांच्याऐवजी ऐरोली युवा सेना प्रमुख स्वप्नील मढवी तेथे उपस्थित होते, असा आरोप अभाविपने याचिकेद्वारे केला होता. भोईर यांना अपात्र ठरवून त्यांना मिळालेली मते रद्द करण्याची मागणी केली होती. अभाविपची ही याचिका वकील गार्गी वारूंजीकर आणि जिनेश जैन यांनी न्यायमूर्ती चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सादर केली. तसेच, त्यावर तातडीने सुनावणीची मागणी केली. खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे थोडक्यात ऐकल्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात त्यात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करून याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला.