मुंबई : मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने अचानकपणे गुरुवारी रात्री उशीरा परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विद्यापीठाने रातोरात निवडणुकीला स्थगिती दिल्याचे परिपत्रक काढले, मात्र शासनाच्या पत्राच्या संदर्भाव्यतिरिक्त या परिपत्रकात निवडणुकीला स्थगिती का देण्यात आली? याबाबत कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसल्यामुळे थेट सत्ताधाऱ्यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता.
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच अशा एकूण दहा जागांसाठी १० सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता. मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक स्थगित झाल्यानंतर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. निषेध!’
तर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर गटाच्या १० पैकी १० जागा लढवून त्या जिंकण्याचा निर्धार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत. हे हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे’.
हेही वाचा : ‘राज’पुत्र विरुद्ध ‘उद्धव’पुत्र सामना लांबला; मुंबई विद्यापीठानं रातोरात सिनेटची निवडणूक केली स्थगित!
राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले
‘मिंधे सरकारला त्यांचा पराभव आणि जवळपास १२ लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांचा कौल आपल्या विरुद्ध जाणार आणि जनतेमध्ये शासनाच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ होणार या भितीने शासनाने ही निवडणूक स्थगित केली आहे. अखेर ‘राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले’ त्याचा युवा सेनेचे सर्व माजी अधिसभा सदस्य तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.’ – प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर, माजी अधिसभा सदस्य, युवा सेना (ठाकरे गट)
भाजप व शिंदे गटाने रडीचा डाव खेळला
‘सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांची युवा आघाडी व विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव निश्चित होणार हे लक्षात आल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला आहे. ज्या वेळी आपल्याला निवडणुकीत जिंकता येणार नाहीत असे लक्षात येते, त्यावेळी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करून निवडणुकीचा कालावधी पुढे ढकलण्याचा एक चुकीचा पायंडा हे शासन पाडत असून याचा आम्ही धिक्कार करतो.’ – रोहित ढाले, राज्य अध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना
हेही वाचा : मुंबईतील बैठकीचे २७ पक्षांना आमंत्रण; काँग्रेस-आप दिल्लीत एकत्रच लढतील -राऊत
विद्यापीठाच्या माध्यमातून कोणी राजकीय पोळी भाजू नये
‘विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन आणि निकाल जाहीर करण्यापाठोपाठ अधिसभा निवडणुकीतही मुंबई विद्यापीठ सपशेल अपयशी ठरले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असते, या ठिकाणी कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली आहे. तर आगामी काळात आम्ही जे परिपत्रक काढू ते विद्यार्थी व पालकवर्गाला मान्य करावे लागेल, असा संदेश मुंबई विद्यापीठाने अधिसभा निवडणुकीसंदर्भात परिपत्रक काढून दिला आहे. शासन आणि विद्यापीठाची वाटचाल ही विकासाकडे नाही तर भकास होण्याच्या मार्गावर चालली आहे.’ – सुधाकर तांबोळी, माजी अधिसभा सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
अन्यथा… कुलगुरूंना घेराव घालू!
‘मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून अचानक त्याला स्थगिती देण्यात येते, हे आश्चर्यकारक आहे. सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा जाहीर निषेध. मुंबई विद्यापीठावर नेमका कोणाचा दबाव आहे ? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येत्या सात दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अन्यथा कुलगुरूंना घेराव घालू.’ – ॲड.अमोल मातेले, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस</p>