९४ हजार ६३१ पात्र, तर १८ हजार ६४० नोंदणीकृत पदवीधर मतदार अपात्र * निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम ४ ते ५ दिवसांत जाहीर होणार
मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवार, २७ जुलै २०२३ रोजी नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदारयादी जाहीर केली आहे. अंतिम मतदारयादीनुसार ९४ हजार ६३१ पदवीधरांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर १८ हजार ६४० अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. पदवीधर गटाची अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी मतांचे गणित जुळवण्यास सुरुवात केली आहे. सदर निवडणुकीत कोण बाजी मारत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> शिवडी क्षयरोग रुग्णालय: निम्मा पावसाळा सरत आला तरी सफाई कर्मचारी रेनकोट, छत्री, गमबुटच्या प्रतीक्षेत
संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, विद्या परिषदेवरील प्राध्यापक, संलग्न महाविद्यालयातील प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, अभ्यास मंडळांवरील विभागप्रमुख या मतदारसंघांची निवडणूक यशस्वीरित्या पार पडल्यानंतर बहुप्रतिक्षित पदवीधर गटाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने पदवी प्रमाणपत्र व फोटो जोडणे, वैयक्तिक माहितीमध्ये चुका आणि विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे सदर नोंदणीकृत पदवीधरांच्या अंतिम मतदारयादीत १८ हजार ६४० अर्ज अपात्र ठरले आहेत.
हेही वाचा >>> मुंबईकरांनो, उद्याही घराबाहेर पडू नका! अतिवृष्टीबाबत हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
अपात्र अर्ज ठरलेल्या या सर्व नोंदणीकृत पदवीधरांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची पुन्हा संधी मिळणार नाही. यंदा त्यांना मतदानाला मुकावे लागणार आहे.
नोंदणीकृत पदवीधरांना अंतिम मतदारयादीतील पात्र अर्जांची यादी https://mu.eduapp.co.in/Approved3.aspx आणि अपात्र अर्जांची यादी https://mu.eduapp.co.in/Rejected3.aspx या संकेतस्थळावर पाहता येईल. याचसोबत ‘नोंदणीकृत पदवीधरांना अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्याबाबतची माहिती मोबाइलवर संक्षिप्त संदेश पाठवून कळविण्यात आलेली आहे. सदर संदेशामध्ये आपला अर्ज ‘पात्र’ आहे की ‘अपात्र’ याबाबत कळवण्यात येणार आहे’, असे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी स्पष्ट केले. ‘नोंदणीकृत पदवीधरांनी अधिक माहितीसाठी https://mu.ac.in किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तर नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम येत्या ४ ते ५ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे’, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपकुलसचिव विकास डवरे यांनी स्पष्ट केले.