मुंबई : मतदार नोंदणी व मतदारयादीवर आक्षेप, राजकीय आरोप –प्रत्यारोप, न्यायालयातील लढाई, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, एका वर्षात निवडणुकीला दुसऱ्यांदा दिलेली स्थगिती आदी विविध कारणांमुळे रखडलेली मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक तब्बल दोन वर्षांनंतर आज होत आहे. यानिमित्ताने विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील मतदान केंद्रांवर नोंदणीकृत पदवीधर मतदार मतदान करण्यासाठी पोहोचत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विविध विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीची वाट पाहत होते. विविध विद्यार्थी संघटना व त्यांच्या उमेदवारांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदान करता येणार आहे. तसेच विद्यार्थी संघटनांनी मतदान केंद्रांच्या परिसरात मतदान माहिती कक्ष उभारले आहे. या मतदान माहिती कक्षांवर मतदार यादी ठेवण्यात आली असून पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे ? आपले उमेदवार नेमके कोण ? यासंदर्भात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून इत्यंभूत माहिती दिली जात आहे. या मतदान माहिती कक्षांवर विद्यार्थी संघटना व त्यांच्याशी संलग्नित राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी भेट देत असून त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडत आहे.
हे ही वाचा…मुंबई : धावत्या रेल्वेत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग
या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांच्या चेहऱ्यावर उत्सूकता दिसत आहे. तसेच मतदानाच्या प्रक्रियेबाबत ते मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर समाजमाध्यमांवर नोंदणीकृत पदवीधर मतदारांकडून छायाचित्र व सेल्फी अपलोड करून मतदान करण्याचे आवाहनही केले जात आहे. कार्यालयीन कामकाजातून काहीसा वेळ काढून, तर काही जणांनी थेट सुट्टी घेऊन मतदान केंद्रवर दाखल होत आहेत. मतदान केंद्र परिसरात नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एकूण १३ हजार ४०६ नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रांवर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडत आहे.
हे ही वाचा…साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले
ठाकरे गटाची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत, अपक्षांची मतेही निर्णायक
युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा १ आणि ३ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिंदे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एकाही उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे, यंदाची अधिसभा निवडणूक ही थेट युवासेना (ठाकरे गट) विरूद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यात होत आहे. अपक्ष उमेदवारांची मतेही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.