मुंबई : पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य, विधि, विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनासाठी किती रुपये खर्च करण्यात आले, यासंदर्भातील सत्र आणि वर्षनिहाय सांख्यिकी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देयक विभागाकडून संबंधित खर्चाची एकत्रित सांख्यिकी माहिती उपलब्ध करण्यात आली. या माहितीनुसार पुनर्मूल्यांकनासाठी २०२१ मध्ये १ लाख १५ हजार १२५ रुपये खर्च करण्यात आले. करोनाकाळामुळे इतर वर्षांच्या तुलनेत २०२१ या वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी कमी पैसे खर्च करण्यात आले. त्यानंतर २०२२ या वर्षात ३ लाख ३१ हजार ४७५, २०२३ या वर्षात ३ लाख ६१ हजार ८५५ रुपये खर्च करण्यात आले होते.

हेही वाचा : मुंबई : झोपु योजनांसाठी म्हाडालाही नियोजन प्राधिकरणाचा दर्जा हवा!

मुंबई विद्यापीठातर्फे एका विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क घेण्यात येते. तर, एका विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५ रुपये मोजून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र एका उत्तरपत्रिकेची पुर्नतपासणी करण्यासाठी शिक्षकाला अवघे २५ रुपये दिले जातात आणि गरज असल्यास काही शिक्षकांना प्रवासी भत्ताही दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून एवढे पैसे का घेतले जातात ? पुनर्मूल्यांकनानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील, तर ही विद्यापीठाच्या मूल्यमापनातील चूक असून विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड का ? असे प्रश्नही विहार दुर्वे यांनी उपस्थित केले आहेत.

‘बहुसंख्य विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होतात, परिणामी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी शिक्षकांना कमी मानधन दिले जाते. पण त्याच वेळी विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी जास्त पैसे घेतले जातात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांकडून कमी पैसे घ्यावेत. तसेच जेव्हा विद्यार्थी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना निम्मे पैसे परत द्यावेत’, असे मत विहार दुर्वे यांनी व्यक्त केले. एका विषयासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क आहे. उत्तरपत्रिका छायाप्रतींसाठी ५० रुपये शुल्क आहे.

हेही वाचा : वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

‘अत्यंत काळजीपूर्वक तपासणी’

पुनर्मूल्यांकनानंतर संबंधित विद्यार्थ्याची निकाल प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागते. तसेच सदर विद्यार्थ्याची गुणपत्रिका ही नव्याने तयार करून त्याला देण्यात येते. निकाल प्रक्रिया करणारा विभाग हा विनाअनुदानित स्वरूपातील असून कर्मचाऱ्यांच्या मानधनासह इतर खर्चही असतो. पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेत केवळ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचे मानधन नसते. तर एकूण प्रशासकीय व संपूर्ण प्रक्रियेचा खर्च पाहून ती रक्कम आकारली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची अत्यंत व्यवस्थितपणे तपासणी केली जाते. त्यामध्ये त्रुटी राहू नयेत, याची विशेष काळजी घेतली जाते, असे विद्यापीठ प्रशासनानाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university spent lakhs of rupees on revaluation process every year mumbai print news css