मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी मंगळवार, २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करता येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स – ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आली आहे. तसेच दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचीही (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच विविध १३३ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठीही प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी अनिवार्य असेल. इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यापीठामार्फत पदवीच्या प्रथम वर्षासाठी स्वतंत्ररित्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून त्यानंतरच महाविद्यालये आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली असून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

पारंपरिक अभ्यासक्रमापासून एव्हिएशनपर्यंत अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., बीएएमएमसी, बीएसडब्ल्यू, बी.ए. फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन, फ्रेंच स्टडीज, जर्मन स्टडीज, बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए – एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए – एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बी.कॉम. फायनान्शिअल मार्केट, अकॉउन्टींग अँड फायनान्स, बँकिंग अँड इन्शुअरन्स, फायनान्शिअल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट स्टडीज, बी.एस्सी – माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, हॉस्पिटॅलिटी स्टडी, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र , जैवतंत्रज्ञान, मेरिटाईम, समुद्री विज्ञान, न्यायवैद्यकशास्त्र, होम सायन्स, एरोनॉटिक्स, विदाशास्त्र, एव्हिएशन, ह्युमन सायन्स, बी.व्होक टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए संगीत, बीपीए नृत्य, एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम यांसह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असणार आहे.