मुंबई : ठाणे शहरातील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे ठाणे उप – परिसरात ‘पीएम-उषा’ योजनेअंतर्गत १०० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासह, खेळाचे सुसज्ज मैदान, वर्षा संचयन प्रकल्प, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वाराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यापैकी १०० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे सौर पॅनल बसवण्याच्या अनुषंगाने फ्रेमिंग फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विविध अनुषंगिक कामे अंतिम टप्प्यात असून विविध स्तरावर चाचण्या घेतल्या जात आहेत. ठाणे उप – परिसर हे सौर उर्जेचा वापर करणारे विद्यापीठाचे पहिले उप-परिसर म्हणून ओळखले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाने ४८ लाख रुपये खर्च करून ही सुविधा निर्माण केली आहे.
‘विजेची वाढती मागणी आणि किंमतीमुळे मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच हरित संकुलाच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तसेच याच धर्तीवर कल्याण येथील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाईड सायन्सेस येथे हा प्रकल्प राबवला जात आहे. ठाणे उप – परिसराच्या बळकटीकरणाचाच भाग म्हणून सुसज्ज मैदान, पर्जन्य जलसंचयन, अंतर्गत रस्ते, संरक्षकभिंत आणि प्रवेशद्वाराचे बांधकामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असून नजीकच्या काळात जिल्हा नियोजन समितीमार्फत संगणक, प्रिंटर्स, वर्ग खोल्यांमध्ये पब्लिक एड्रेस यंत्रणा आणि सीसी टीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे’, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सौर ऊर्जा प्रकल्पाची वैशिष्ट्ये
ठाणे उप-परिसरातील १०० किलोवॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण उप- परिसराला हरित उर्जा मिळणार असून या प्रणालीतील नेट मीटर यंत्रणेसह सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर समाविष्ट असल्याने अतिरिक्त उर्जाही विकसित करून त्याचे नियोजन केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे मासिक उर्जेच्या बिलात खूप मोठी बचत होणार असून उर्जेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास हे उप परिसर सक्षम बनणार आहे. साधारणपणे १०० किलोवॅट सोलर पॅनल प्रणालीचा उपयोग करून प्रतिवर्षी १ लाख ३० हजार युनिट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ६० टन कोळसा आणि त्यापासून प्रतिवर्षी निर्माण होणाऱ्या १०६ कार्बनडायऑक्साईडपासून मुक्तता मिळणार आहे.