मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे (एएनआरएफ) सुरू करण्यात आलेल्या ‘पार्टनरशिप्स फॉर एक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च’ (पीएआयआर) उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या ‘हब’ अंतर्गत मुंबई विद्यापीठ ‘स्पोक’ म्हणून काम करणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या संशोधनाचे क्षितिज विस्तारणार आहे.

देशभरातील निवडक सात ‘हब’ संस्थांमध्ये आयआयटी मुंबईची निवड झाली असून या ‘हब’ संस्थेशी संलग्न असलेल्या ‘स्पोक’ संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. या भागिदारीमुळे मुंबई विद्यापीठाला आयआयटी मुंबईसारख्या उच्च-स्तरीय संस्थेच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ मिळणार असून विद्यापीठातील संशोधनाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधकांना ‘इंडस्ट्री ४.०’, ‘ॲडव्हान्स मटेरियल्स’ आणि ‘ग्रीन एनर्जी व सस्टेनेबिलिटी’ यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या नेटवर्कसाठी पुढील पाच वर्षांसाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे दोन्ही संस्थांना अत्याधुनिक संशोधन सुविधा विकसित करणे, उच्च दर्जाचे संशोधन करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकणारे निष्कर्ष प्राप्त करणे शक्य होणार आहे. तसेच ज्ञान आणि कौशल्याची देवाणघेवाण, आधुनिक संशोधन सुविधा, उपकरणे आणि पायाभूत सुविधा, आंतर-संस्थात्मक सहकार्य, विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या संशोधनात सहभागी होण्याची आणि प्रख्यात प्राध्यापकांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळणार आहे. तर मुंबई विद्यापीठात एक उत्कृष्ट संशोधन संस्कृती विकसित होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातच नव्हे, तर उच्च शिक्षण क्षेत्रातही एक सकारात्मक बदल घडेल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातर्फे प्रमुख अन्वेषक म्हणून विद्यापीठातील संशोधन विकास कक्षाचे संचालक प्रा. फारुख काझी या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत. ते मुंबई विद्यापीठातील संशोधन कार्याला दिशा देणार असून आयआयटी मुंबईसोबत समन्वय साधून प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करणार आहेत. तर आयआयटी मुंबईतर्फे प्रा. व्ही. एम. गद्रे नेतृत्व करणार आहेत.

आयआयटी मुंबई ‘हब’अंतर्गत मुंबई विद्यापीठासह पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, पुणे व नागपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी), गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि शेर – ए – काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांचीही ‘स्पोक’ म्हणून निवड करण्यात आली आहे.