मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांसाठी क्रमवारी आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. सर्व शैक्षणिक विभाग, उप परिसर आणि आदर्श महाविद्यालयांचे विविध निकषांवर मूल्यांकन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात क्रमवारी जाहीर केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक विभागांची क्रमवारी (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क – यूडीआरएफ) जाहीर करण्याचा निर्णय घेणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. नुकत्याच १२ सप्टेंबरला पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या उपक्रमास मंजुरी देण्यात आली. क्रमवारीच्या विविध निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास ५ ते २५ लाखांचे संशोधन अनुदान पुरस्कार, प्रशंसा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल.

हेही वाचा – मुंबई : हार्बर मार्ग विस्कळीत

मुंबई विद्यापीठातील विज्ञान शाखेअंतर्गत १५, वाणिज्य व व्यवस्थापन, कौशल्य / ऑनलाईन शिक्षण आणि आदर्श महाविद्यालये ८, मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रे १०, भाषा १५, आंतरविद्याशाखीय १२ आणि विविध २० अध्यासन केंद्र कार्यरत असून या सर्व विभागांसाठी ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा – एनआयआरएफ’ आणि ‘क्युएस / टाइम्स’ क्रमवारीच्या धर्तीवर तसेच ‘नॅक’च्या गुणांकन पद्धतीनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने परिमाणात्मक मूल्यांकन प्रणाली तयार केली आहे. ‘शैक्षणिक विभागांसाठी क्रमवारी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे विविध विभागांना त्यांचा शैक्षणिक दर्जा, क्षमता आणि संधी अशा अनुषंगिक बाबींवर विशेष भर देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे’, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

क्रमवारी व पुरस्कारांचे स्वरूप कसे?

सर्व विभागांच्या वर्गवारीनुसार क्रमवारी जाहीर केली जाणार असून प्रत्येक वर्गवारीतून प्रथम येणाऱ्या विभागास ५ ते २५ लाख रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. विज्ञान वर्गवारीतून प्रथम येणाऱ्या विभागास पुरस्कार म्हणून १५ लाख, इतर विभागांसाठी १० लाख, तर अध्यासन केंद्रासाठी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. विज्ञान वर्गवारीतून द्वीतीय क्रमांकासाठी ७ लाख, भाषा मानव्यविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन वर्गवारीतून ५ लाख आणि अध्यासन केंद्रांसाठी २ लाख रुपये देण्यात येतील. सर्वसाधारण सर्वोत्कृष्ट विभागास अतिरिक्त १० लाख आणि द्वीतीय सर्वसाधारण विभागास ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल. ‘डिपार्टमेंट विथ पोटेंशिएल फॉर एक्सलेंस’अंतर्गत विशेष विभागाची निवड करून पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच विद्यापीठातील शिक्षकांना ‘बेस्ट रिसर्च फंडिंग ॲण्ड इनोव्हेशन अवार्ड’, तसेच उत्कृष्ट संशोधन प्रकाशन पुरस्कारही दिला जाणार आहे.

हेही वाचा – मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्पा दसऱ्यापूर्वी वाहतूक सेवेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

विविध निकषांवर मूल्यांकन

संशोधन आणि व्यावसायिक क्रियाकलाप, विभागस्तरीय प्रशासन आणि व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची प्रगती आणि यश, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन प्रक्रिया, फॅकल्टी आऊटपूट, परिषदा, कार्यशाळा आणि साहचर्य या सहा महत्त्वपूर्ण, तसेच विविध सरकारी व औद्योगिक संस्थामार्फत मिळणारे अनुदान व निधी, महत्त्वाचे संशोधन प्रकल्प, शैक्षणिक सामंजस्य करार व औद्योगिक जगताशी असलेले संबंध आदी विविध निकषांवर विभागांचे तज्ज्ञ समितीमार्फत मूल्यांकन केले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university will announce the ranking for academic departments in november mumbai print news ssb