मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक शनिवारी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानणारा असावा आणि विविध उपयोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन निधीचा व्यवस्थित वापर व्हावा, असे मत विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत विद्यार्थी व शिक्षकांसंबंधित विविध प्रश्न, नवीन प्रकल्प व उपक्रम, विशेष तरतुदी आदी विविध गोष्टींवर सविस्तर चर्चा केली जाते. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित मुद्दे आणि रखडलेल्या प्रकल्पांवरून विद्यार्थी व शिक्षक संघटना आणि मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगीही निर्माण होते. गतवर्षी मुंबई विद्यापीठाचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा ८५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात १२१ कोटी ६० लाख रुपयांची तूट दाखविण्यात आली होती. तसेच नावीन्यपूर्ण संस्कृतीचे बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यापीठ- औद्याोगिक साहचर्य उपक्रमांसाठी भरीव तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना असतील? कोणत्या प्रकल्पासाठी किती तरतूद असेल? याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षणवर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानणारा मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प असला पाहिजे. या अर्थसंकल्पात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांचा समावेश असण्यासह पुरेशी तरतूद असावी’, असे मत ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले.‘मुंबई विद्यापीठाने अर्थसंकल्पात विद्यार्थी विकास आणि समुपदेशन केंद्र प्रभावी करण्यावर भर दिला पाहिजे. अनेकदा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध उपाययोजनांद्वारे निधीची तरतूद केली जाते. मात्र या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि निधीचा उपयुक्त वापर होत नाही, तर अर्थसंकल्प मांडताना या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे’, असे मत बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनचे (बुक्टु) सरचिटणीस आणि शिक्षक गटातील अधिसभा सदस्य चंद्रशेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य केंद्रासाठी तरतूद केली जाते, मात्र प्रत्यक्षात आरोग्य केंद्रात सोयीसुविधांची वानवा आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी पुरेसा निधी देऊन व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच वसतिगृह आणि उपाहारगृहांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष उपाययोजनांची मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद असावी’, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.