मुंबई: दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील उत्तन, डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी १ हजार ४०६ झाडे कापण्यासाठी मिरा-भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. तसेच आणखी ९ हजार ९०० झाडांच्या कापणीसाठी उद्यान विभागाने जाहिर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उत्तन कारशेडसाठी आता एकूण ११ हजार ३०६ झांडे कापली जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञांकडून विरोध केला जात आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिका बांधली जात आहे. या मार्गिकेसाठी भाईंदरमधील राई, मुर्धा, मोर्वा येथे कारशेड प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र तेथे कारशेड बांधण्यास नागरिकांनी विरोध केल्याने राज्य सरकारला कारशेडची जागा बदलावी लागली. त्यानुसार उत्तन, डोंगरी येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने कारशेडच्या बांधकामास मंजुरी दिली. त्यानंतर ५९.६५ हेक्टर जागेवर कारशेडचे बांधकाम करण्याच्यासाठी एमएमआरडीए कामाला लागले.

मेट्रोसाठी किती झाडांचा बळी?

कारशेडच्या कामासाठी डोंगरीतील झाडे कापावी लागणार असल्याने एमएमआरडीएने गेल्या वर्षी १ हजार ४०६ झाडे कापण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडे परवानगी प्रस्ताव पाठवला होता. उद्यान विभागाने त्यावर सूचना-हरकरती मागवल्या. तेथील वृक्षतोडीला स्थानिकांनी पर्यावरणप्रेमी-तज्ज्ञांनी विरोध करत मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर केल्या. मात्र त्या सूचना-हरकतींचा कोणताही विचार न करता १ हजार ४०६ झाडे तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिली. दरम्यान कारशेडच्या कामासाठी १ हजार ४०६ इतकीच झाडे कापली जाणार असे वाटत असताना आता झाडांची संख्या आणखी वाढली आहे. कारण आता कारशेडसाठी १ हजार ४०६ नव्हे तर एखूण ११ हजार ३०६ झाडे कापली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरा-भाईंदरच्या पालिकेच्या उद्यान विभागाच्या १२ मार्चच्या एका जाहिर सूचनेतून कारशेडच्या कामासाठी आणखी ९ हजार ९०० झाडे कापली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एमएमआरडीएकडून उत्तन कारशेडच्या कॉमसाठी ९ हजार ९०० झाडे कापण्यासाठीचा परवानगी मागण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेच्या उद्यान विभागाने आवश्यक ती कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. एकूणच उत्तन कारशेडसाठी आता ११ हजार ३०६ झाडे तोडली जाणार असून ही संख्या बरीच मोठी आहे. इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल होणार असल्याने स्थानिक, पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एमएमआरडीए म्हणते ३७१७ झाडे कापणार, उर्वरित पुनर्रोपित करणार

कारशेडच्या कामासाठी दुसर्या टप्प्यात ९९०० झाडांसंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र या ९९०० झाडांपैकी केवळ २८८४ झाडे कापली जाणार असून उर्वरित ७०१६ झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ८३२ झाडे कापली जाणार असून ५७४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. एकूणच दोन्ही टप्प्यात एकूण ७५९० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर केवळ ३७१६ झाडे कापली जाणार असून १०९४ झाडांचे आहे त्या स्थितीत जतन केले जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तसेच पालिका क्षेत्रात २५ हजार झाडे लावण्यासाठी मिरा-भाईंदर पालिकेला एमएमआरडीएकडून आवश्यक तितका निधीही दिला जाणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले. तर कारशेडच्या कामादरम्यान पर्यावरणास कुठेही धक्का बसणार नाही याची हमीही दिली आहे.

आरे जंगलासारखाच हा प्रकार

मेट्रो ३ मार्गिकेतील कारशेडसाठी ज्या प्रकारे आरे जंगलात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली, त्याप्रमाणेच उत्तनमध्येही वृक्षतोड होणार आहे.त्याचवेळी ७०१६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असले तरी ती झाडे मुळासकट काढली जाणार आहेत. यातील किती झाडे वाचणार हे माहित नाही. त्यामुळे एमएमआरडीएकडून ३७२६ झाडे कापण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या संख्येने झाडे कापण्यात येण्याची शक्यता आहे.

उत्तनमधील हिरवळीचा परिसर ओसाड करुन टाकला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षतोडीविरोधात मोठ्या संख्येने नागरिकांनी याआधी सूचना-हरकती सादर केल्या आहेत. मात्र त्या सूचना-हरकतींना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानुसार दुसर्या टप्प्यातही असेच होणार आहे. अशोक पाटील – अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था (स्थानिकांची संस्था)

Story img Loader