करोनाच्या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढत असून, लोक लस घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, लोकांच्या गरजांचा गैरफायदा घेत काही जण इथेही नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आले आहेत. मुंबईत हाऊसिंग सोसायटी, महाविद्यालय आणि चित्रपट निर्मिती संबंधित कंपन्यांनी पैसे देऊन आयोजित शिबिरांमध्ये लसीकरण घोटाळा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, तपास सुरू आहे. याच मुद्द्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. लसीकरण कार्यक्रमादरम्यान उघडकीस आलेल्या या गैरप्रकारानंतर ठाकरे यांनी हाऊसिंग सोसायट्यांसह नागरिकांना आवाहन केलं आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या हिरानंदानी इस्टेट या हाऊसिंग सोसायटीत लसीकरण शिबीर घेण्यात आलं होतं. मात्र, लस घेतलेल्या व्यक्तींना ज्या रुग्णालयाच्या नावानं प्रमाणपत्र देण्यात आलं, त्यांनी अशा लसीकरण शिबिरांना लस पुरवठा करत नसल्यानं खळबळ उडाली होती.
हेही वाचा- हाऊसिंग सोसायटी, प्रोडक्शन हाऊसनंतर मुंबईतील कॉलेजपर्यंत पोहोचला लसीकरण घोटाळा
या प्रकरणात काही आरोपींची नावं आल्यानंतर काही चित्रपट निर्मितीशी संबंधित असलेल्या कंपन्यांनीही त्यांच्यामार्फत लसीकरण शिबिरं घेतली होती. त्याचबरोबर मुंबईतील एका महाविद्यालयालाही बोगस लसीकरणाच्या माध्यमातून गंडा घालण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणांची सर्वत्र चर्चा होत असून, यासंदर्भात माध्यमांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यासंदर्भात विचारणा केली.
यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,”या विषयावर आताच बोलणं योग्य ठरणार नाही. यामुळे लोकांमध्ये मोठ्या स्वरूपात भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सगळा अहवाल समोर येऊ द्या. जेव्हा संपूर्ण माहिती समोर येईल, तेव्हा योग्य ती कारवाई केली जाईल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा-हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण प्रकरण; मुंबई पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
सोसायट्यांना, नागरिकांना केलं आवाहन
गेल्या काही दिवसात उघडकीस आलेल्या या लसीकरण घोटाळ्याच्या घटनांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना आणि लसीकरण शिबिरं आयोजित करु इच्छिणाऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. “हाऊसिंग सोसायट्यांनी अशा पद्धतीने लसीकरण शिबीर आयोजित करताना महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी घ्यायला हवी. अशा पद्धतीने लसीकरण करणाऱ्या कंपन्यांच्या पार्श्वभूमीबद्दल सोसायट्यांनी चौकशी करून घ्यायला हवी. लसीकरण करण्यासाठी ज्या टीम येत आहेत, त्या अधिकृत आहेत की नाहीत, याबद्दल व्यवस्थित माहिती घेणं हे सोसायटी आणि सरकारी यंत्रणेची जबाबदारी आहे,” असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.