करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असल्याने महापालिका प्रशासन तयारी करत आहे. मुंबईतील लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून, यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील लसीकरणाबद्दल माहिती दिली. सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबांची काळजी घेतली, तर आपण दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट थोपवू शकू,” असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली. “देशात तरुणांचं मोफत लसीकरण सुरू होत आहे. वारंवार स्थगिती दिली गेल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयातून लस घेतली. मात्र, आता सर्वात मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण सुरू करत आहोत. सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण महापालिका करणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवस वॉक इन लसीकरण केलं जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबद्दल बोललं जात होतं. पण, आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की, ज्याप्रमाणे आरोग्य शिबिरं घेतली जातात, त्याचप्रमाणे पाच किंवा किमी अंतरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरं झाली पाहिजे. सरकारकडून लस मिळाली, तर महापालिका अशा स्वरूपातही लसीकरण करेल. उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होत आहे. रिक्षाचालक आणि फेरीवाले यांचं लसीकरण करण्याला प्राध्यान देण्याचा विचार केला जात आहे,” असं महापौर म्हणाल्या.
“आज प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डमध्ये एक केंद्र असावं म्हणून दोन केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. नगरसेवकांच्या केंद्रामध्ये लसी द्यायला हरकत नाही. ज्या सोसायट्यांना सोसायटीमध्येच लसीकरण शिबिरं आयोजित करायची आहे. त्यांनी महापालिकेकडे संबंधित माहिती द्यायला हवी. आता तज्ज्ञ सांगत आहे की, तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल. आता त्या विषाणूचं स्वरूप बदलत आहे. त्यामुळे सगळ्यांनी कुटुंबांची काळजी घ्यायला हवी. जर नागरिकांनी काळजी घेतली, तर आपण ज्याप्रमाणे दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झालो, तसंच तिसऱ्या लाटेतही यशस्वी होऊ,” असं महापौर म्हणाल्या.