बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या भाजपाच्या ‘पोल खोल’ अभियानाला मंगळवारी सुरुवात करण्यात येणार होती. पण त्याआधीच अज्ञातांनी पोल खोल करण्यात येणाऱ्या रथाची तोडफोड करत नुकसान करण्यात आले. या या रथाची सोमवारी चेंबूरमध्ये तोडफोड करण्यात आली. या मोहिमेत एकूण ४० वाहने असणार आहेत. तर त्यांच्यावर स्क्रीन लावल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने सोमवारी प्रचार मोहीम सुरू केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्या पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महापालिकेमधील भ्रष्टाचाराची जाणीव करून देण्यासाठी शहरात अभियान राबण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता चेंबूरमध्ये या अभियानाची सुरुवात होणार होती. एका रथाद्वारे हे अभियान राबवण्यात येणार होते. भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे वाहनाला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र त्याआधीच या वाहनाची तोडफोड करण्यात आली.
संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा भाजपा नेत्यांनी दिला आहे. या तोडफोड प्रकरणी तक्रार करण्यासाठी भाजपा नेते हे चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडू, यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा भाजपा नेत्यांनी यावेळी दिला.
यानंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘पोल खोल’ प्रचाराच्या रथाला हिरवा झेंडा दाखवला. हा रथ प्रत्येक गल्लीपर्यंत जाणार आहे. शिवसेना पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करते. रस्त्यावर कचरा, खड्डे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.
चेंबूर परिसरात भाजपeच्या ‘पोल खोल’ प्रचाराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांची ओळख पटण्यात आली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
दरम्यान, याआधी मुंबईतील कांदिवली होणाऱ्या भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची तोडफोड करण्यात आली होती. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या पोल खोल सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचे काम करु करण्यात आलं होतं. मात्र रात्री एकच्या सुमारास सभेच्या स्टेजची तोडफोड करण्यात आली.
“सोमवारी आम्ही गोरेगाव येथील पत्रा चाळ येथे प्रचाराला सुरुवात केली. समोर शिवसेनेची शाखा होती, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. आम्ही पोलिसांशी बोललो असून पोलिसांच्या परवानगीने कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ स्टेज उभारण्यात आला,” असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले.