मुंबई : वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास या वसाहतीतील रहिवाशांना मालमत्ता कराची लाखो रुपयांची थकबाकीसह देयके आली आहेत. पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाकडून आलेली ही बिले भरण्यासाठी १७ मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ही थकबाकी निर्माण झाल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. ही लाखोंची बिले अवघ्या काही दिवसांत कशी भरायची, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मात्र ही देयके योग्य असल्याचे म्हटले आहे.

वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास या वसाहतीत ‘फुलराणी’, ‘झपुर्झा’, ‘शाकुंतल’सह नऊ इमारती आहेत. या नऊ इमारतींना मालमत्ता कराची २०२२ पासूनची थकबाकी असलेली लाखोंची देयके पाठवण्यात आली आहेत. या वसाहतीतील ‘फुलराणी’ या इमारतीत राहणारे रहिवासी सिद्धार्थ पारधे यांनी सांगितले की, आमच्या इमारतीत एकूण १४ घरे आहेत. या इमारतीला १५ लाख ९६२ रुपये मालमत्ता कराचे थकबाकीसह देयक आले आहे. त्यामुळे प्रत्येक घराला १ लाख ११ हजार ५६५ रुपये मालमत्ता कर भरावा लागणार आहे. इतक्या कमी वेळात ही देयके कशी भरणार? त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी सिद्धार्थ पारधे यांनी केली केली आहे.

प्रकरण काय?

साहित्य सहवासमधील घरे ही ६२० आणि ७५० चौरस फुटांची आहेत. काही वर्षांपूर्वी या वसाहतीतील घरांना १२० चौरस फुटांची वाढीव जागा मिळाली होती. या वाढीव जागेचे मालमत्ता कर देयक वेगळे दिले जात होते. मात्र, २०२२ मध्ये जेव्हा ५०० चौरस फुटांच्या आतील आकाराच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात आली तेव्हा या १२० चौरस फूट जागेचे मालमत्ता कर देयक संगणकामध्ये शून्य दाखवण्यात आले होते. साहित्य सहवासमधील रहिवाशांना २०२२ पासून या वाढीव १२० चौरस फुटाचे देयकच येत नव्हते. ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे पालिकेने आता २०२२ पासूनची थकबाकीसह देयके रहिवाशांना पाठवली आहेत.

आता पाठवण्यात आलेली देयके ही योग्य आहेत. त्यामुळे ती रहिवाशांना भरावीच लागतील.

-विश्वास शंकरवार, उपायुक्त, मुंबई महानगरपालिका

Story img Loader